मुंबई : अजिंक्य रहाणे हा खूप समजदार कर्णधार ठरेल आणि तो ऑस्ट्रेलियाविरोधात तीन कसोटी सामन्यात आपल्या संतुलित आक्रमकतेने स्वत:ला सिद्ध करेल, असा विश्वास माजी कर्णधार सचिन तेंडुलकर याने बुधवारी व्यक्त केला.
ॲडिलेडमध्ये दिवसरात्र पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहली नेतृत्व करणार आहे. त्यानंतर विराट कोहली मायदेशी परतेल. तेंडुलकर याने रहाणेला धर्मशालामध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात भारताकडून नेतृत्व करताना पाहिले आहे. त्यामुळे तो यावेळी देखील चांगला कर्णधर सिद्ध होईल,अशी आशा सचिननीे व्यक्त केली.
एका युट्युब चॅनेलशी बोलताना सचिन म्हणाला,‘ही मालिका वेगळी असेल. रहाणेला मी ओळखतो. मला माहीत आहे तो खूप समजदार आणि संतुलित आहे. त्याची आक्रमकता नियंत्रित आहे. मी त्याच्यासोबत वेळ घालवला आहे. तो खूपच मेहनती खेेळाडू आहे. तो कुणलाही कमी लेखत नाही. जर मेहनत केली तर त्याचा परिणाम नक्कीच चांगला मिळतो. मला आशा आहे की, संघ चांगली तयारी करेल.’ निकालावर फोकस न करता सामन्यादरम्यान प्रत्येक घडामोडींवर बारीक नजर असायला हवी. निकाल आपोआप तुमच्या बाजूने येईल,असे मत सचिनने मांडले.