IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard : अक्षर पटेलने ( Axar Patel) दिलेल्या धक्क्यांनंतरही ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. ऑसी कर्णधार अॅरोन फिंच याने १५ चेंडूंत ३१ धावा करून चांगली फटकेबाजी केली. जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) भन्नाट यॉर्कर टाकून त्याचा त्रिफळा उडवला. अक्षर पटेलने पुन्हा चांगली गोलंदाजी केली, परंतु फिंचनंतर मॅथ्यू वेडने भारतीय गोलंदाजांची शाळा घेतली. वेडने २० चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ४३ धावा केल्या.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा ट्वेंटी-२० सामना अडीच तासांच्या विलंबानंतर अखेर सुरू झाला. नागपूरच्या स्टेडियमची खेळपट्टी ओली असल्याने खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर एकाही खेळाडूचे जखमी होणे संघाला महागात पडणारे ठरेल असते. त्यामुळे अम्पायर पूर्ण सहानिशा करताना दिसले. चौथ्यांदा पाहणी केल्यानंतर अम्पायर्सनी समाधान व्यक्त केले आणि सामन्याला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. प्रत्येकी ८-८ षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय झाला. भारताने आज नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराह व रिषभ पंत खेळणार आहेत. उमेश यादव व भुवनेश्वर कुमार खेळणार नाहीत.
एक गोलंदाज २ षटकं फेकू शकत असल्याने रोहितने पहिल्या षटकात हार्दिक पांड्याला गोलंदाजीला आणले अन् पहिल्याच चेंडूवर थोड्याशा अंतराने आरोन फिंचचा त्रिफळा उडता उडता वाचला. दुसऱ्याच चेंडूवर फिंचने दिलस्कूप मारून चौकार मिळवला. अक्षर पटेलने टाकलेल्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विराट कोहलीकडून कॅमेरून ग्रीनचा सीमारेषेवर झेल सुटला. पण, पुढच्याच चेंडूवर विराट व अक्षरने त्याला रन आऊट करून ऑसींना पहिला धक्का दिला. अक्षरने त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलचा त्रिफळा उडवला. ऑस्ट्रेलियाच्या २ बाद १९ धावा झाल्या.
अक्षरने त्याच्या पुढच्या षटकात टीम डेव्हिडला ( २) बाद करून ऑसींना मोठा धक्का दिला. अक्षरने त्याच्या २ षटकांत १३ धावा देताना २ विकेट्स घेतल्या. पाचव्या षटकात जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला अन् स्टेडियममध्ये नावाचा गजर घुमला. बुमराहने त्याच्या षटकाच्या अखरेच्या चेंडूवर भन्नाट यॉर्कर टाकून फिंचचा त्रिफळा उडवला. ऑसी कर्णधार १५ चेंडूंत ३१ धावा करून माघारी परतला. फिंचने बुमराहच्या यॉर्करचे कौतुक करताना टाळी वाजवली. बुमराहने २ षटकांत २२ धावा देत १ विकेट घेतली. हर्षल पटेलने टाकलेल्या आठव्या षटकात मॅथ्यू वेडने तीन षटकार खेचले. वेडने २० चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ४३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने ५ बाद ९० धावा केल्या. हर्षलने २ षटकांत ३२ धावा दिल्या.
२०१७मध्येही असाच सामना झाला अन्...
७ नोव्हेंबर २०१७ मध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यातला ट्वेंटी-२० सामना ८-८ षटकांचा खेळवण्यात आला होता. न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी केली. भारताने ८ बाद ६७ धावा केल्या आणि किवींना ८ बाद ६१ धावा करता आल्या. भारताने ६ धावांनी जिंकला होता सामना.