Join us  

IND vs AUS 3rd Test: भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी आता इंदूरला खेळवणार! जागा बदलण्याचं कारण काय?

आधी ही कसोटी धर्मशाला येथे खेळवण्यात येणार होती, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 10:06 AM

Open in App

IND vs AUS 3rd Test: बॉर्डर-गावसकर मालिकेतील तिसरी कसोटी आधी धर्मशालाच्या मैदानावर होणार होती. मात्र, मैदान अद्यापही सामना खेळण्यासाठी पूर्णपणे तयार झालेले नसल्याने हा सामना बंगळुरू किंवा विशाखापट्टनमला होण्याची शक्यता होती. पण अखेर BCCI ने या संदर्भातील अधिकृत घोषणा केली. भारत-ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना आता इंदूरच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातील तिसरी कसोटी जी आधी १ ते ५ मार्च दरम्यान HPCA स्टेडियम, धर्मशाला येथे होणार होती, ती आता होळकर स्टेडियम, इंदूर येथे खेळविण्यात येणार आहे, असे ट्विट BCCIकडून करण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाचे क्युरेटर तपोश चटर्जी यांनी मैदानाचे परीक्षण करण्यासाठी धर्मशालाचे मैदान गाठले होते. मात्र, खेळपट्टी आणि आऊटफिल्ड अद्यापही आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी सज्ज नसल्याचे त्यांनी बीसीसीआयला कळवल्याने हा सामना दुसरीकडे हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. कुठलेही मैदान आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यायोग्य तयार होण्यासाठी बीसीसीआयचे काही मापदंड आहेत. याच निरीक्षणांअंती धर्माशालाचे मैदान अद्यापही सज्ज नसल्याचे BCCI च्या लक्षात आले आहे. तसेच तिसरा सामना सुरू व्हायला १६ दिवसांचा कालावधी आहे. तेथील वातावरणामुळेसुद्धा मैदान तयार करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे सामना दुसरीकडे हलवण्यात आला आहे.

हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला वेळ दिला तर आम्ही अद्यापही मैदान पूर्णपणे सज्ज करण्याचा तयारीत आहोत. मात्र, अंतिम निर्णय BCCI च घेऊ शकते. बऱ्याच काळापासून या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामना झाला नाही. त्यामुळे स्थानिक प्रेक्षकांना भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अशा परिस्थितीत BCCI ला जे योग्य वाटेल, ते केले जाईल.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियाइंदौरबीसीसीआय
Open in App