Rohit Sharma Matthew Hayden, IND vs AUS 3rd Test: गाबाच्या मैदानात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने ५१ धावांच्या मोबदल्यात ४ बळी गमावले. ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात ट्रेव्हिस हेड (१५२), स्टीव्ह स्मिथ (१०१) यांची शतके आणि अलेक्स कॅरीच्या (७०) अर्धशतकाच्या बळावर ४४५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताच्या वरच्या फळीतील चार फलंदाजांनी पुन्हा चाहत्यांची घोर निराशा केली. संघाने पन्नाशी गाठण्याआधीच यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली आणि रिषभ पंत तंबूत परतले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत केएल राहुलने एक बाजू सांभाळत नाबाद ३३ धावा केल्या. त्याच्यासोबत रोहित शर्मा नाबाद शून्य धावांवर आहे. त्यामुळे या जोडीवर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत फॉर्म मध्ये नसलेल्या रोहित शर्मासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन याने मोलाचा सल्ला दिला आहे.
"रोहित शर्मा हा एक स्फोटक फलंदाज आहे. तो अतिशय मुक्तपणे खेळतो आणि धावा करतो. वनडे क्रिकेटमध्ये त्याने अगदी सहजतेने द्विशतके मारली आहेत. निर्धारित षटकांच्या सामन्यांमध्ये रोहितने वेळोवेळी दमदार फलंदाजी केली आहे. जर रोहित शर्माला फलंदाजीत पुन्हा फॉर्ममध्ये यायचं असेल तर त्याला सकारात्मक विचारांनी खेळावं लागेल आणि संपूर्ण ऊर्जा फलंदाजीत ओतावी लागेल. अडलेडमध्ये त्याची फलंदाजी फारशी चांगली झाली नाही. पण त्याला आता बराच काळ लोटला आहे. त्यामुळे आता त्याने ते विसरून चांगली फलंदाजी करण्याच्या मानसिकतेने मैदानात जावे. तो नक्कीच यशस्वी होईल," असा सल्ला हेडन याने रोहित शर्माला दिला.
"एक मित्र आणि फलंदाज म्हणून मी रोहितला सांगू इच्छितो की, त्याने उगाच बचावात्मक खेळ करायला जाऊ नये. चेंडू जसा येईल तशा पद्धतीने त्यावर आक्रमक करायला हवे. मैदानात उरताना धावा करण्याचा इराद्याने उतरायला हवे. कारण नैसर्गिक फलंदाजी केली तरच खेळ पुढे जाईल. रोहितला माझं सांगणं असेल की त्याने चेंडू शक्य तितक्या जवळ फ्रंट फूटवर जाऊन खेळावे. रोहितने जर सकारात्मक ऊर्जेने फलंदाजी केली तर त्याला खूपच फायदा होईल. कदाचित माझ्या सल्ल्याचा उद्या खेळताना फायदा झालेला दिसेल," असेही हेडन म्हणाला.
दरम्यान, ४४५ धावांच्या मोठ्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल सलामीला आले. यशस्वी जैस्वाल दुसऱ्याच चेंडूवर ४ धावा काढून बाद झाला. शुबमन गिल १ धाव काढून तंबूत परतला. विराट कोहलीही ३ धावांत माघारी परतला. पाठोपाठ रिषभ पंत ९ धावांवर बाद झाला. केएल राहुलने एका बाजू लावून धरली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित शर्मा (नाबाद ०) सोबत केएल राहुल (नाबाद ३३) पॅव्हेलियनमध्ये परतला. भारत सध्या ४ बाद ५१ धावसंख्येवर असून ३९४ धावांनी पिछाडीवर आहे.
Web Title: IND vs AUS 3rd Test Matthew Hayden advise to Rohit Sharma to bat with more energy to overcome poor form
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.