Rohit Sharma reaction Man of the Match and Man of the Series, IND vs AUS: भारतीय संघाने तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियावर नऊ गडी राखून विजय मिळवला. भारताने प्रथम ऑस्ट्रेलियन संघाला २३६ धावांवर रोखले. त्यानंतर रोहित शर्माचे नाबाद शतक आणि विराट कोहलीचे नाबाद अर्धशतक या दोघांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने मालिका व्हाईटवॉशची नामुष्की टाळली. रोहित शर्माने पहिल्या सामन्यात केवळ ८ धावा केल्या होत्या. पण दुसऱ्या सामन्यात त्याने ७३ धावांची खेळी केली होती. त्यानंतर आजच्या सामन्यात त्याने १२१ धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे त्याला सामनावीर आणि मालिकावीर अशा दुहेरी किताबाने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर रोहितने आपले मत मांडले.
रोहित शर्मा म्हणाला, "ऑस्ट्रेलियातील कठीण परिस्थितीशी झुंजावे लागते याची पूर्ण कल्पना होती. तसेच दर्जेदार गोलंदाजांचा सामना करावा लागतो, हे जाणून घेऊन खेळण्यासाठी तयारी आवश्यक असते. बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिल्याने ही मालिका तयारीच्या दृष्टीने चांगली ठरली. जरी आम्ही मालिका जिंकू शकलो नाही, तरीही अनेक सकारात्मक गोष्टी घेऊन परत जात आहोत. आमचा संघ तरुण आहे, त्यामुळे या अनुभवातून त्यांना खूप शिकायला मिळेल. मी जेव्हा संघात आलो, तेव्हा अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडूंनी आम्हाला मार्गदर्शन केले. आता तीच जबाबदारी आमच्यावर आहे. नवख्या खेळाडूंना अनुभव सांगणे, त्यांना योग्य रणनीती आखण्यास मदत करणे, हे आमचे काम आहे."
"ऑस्ट्रेलियात खेळणे कधीच सोपे नसते, पण प्रत्येक वेळी मी तिथे खेळताना प्राथमिक गोष्टींवर भर देतो. माझ्या सिडनी क्रिकेट ग्राउंडवरच्या आठवणी खूप खास आहेत. उत्कृष्ट विकेट, सुंदर मैदान आणि उत्साही प्रेक्षक मला नेहमीच भावतात. मला क्रिकेट आजही खूप आवडतं आणि तेच प्रेम पुढेही कायम ठेवायचे आहे," असे रोहितने स्पष्ट केले.