IND vs AUS 3rd ODI, Harshit Rana Shine Australia All Out For 236  : गौतम गंभीरनं ज्या युवा हर्षित राणावर भरवसा दाखवला त्या पठ्ठ्यानं भेदक मारा करत ऑस्ट्रेलियन संघाचे कंबरडे मोडले. हर्षित राणानं घेतलेल्या चार विकेट्सच्या जोरावर सिडनीच्या मैदानातील तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाला २३६ धावांत आटोपले आहे. पहिल्या दोन सामने जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या सामन्यात ५० षटकेही खेळता आली नाहीत. हर्षित राणाशिवाय वॉशिंग्टन सुंदरनं २ विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली. 
ऑस्ट्रेलियन सलामी जोडीनं चांगली सुरुवात केली, पण... 
भारताचा युवा कर्णधार शुबमन गिलच्या पदरी नाणेफेकीच्या वेळी पुन्हा एकदा निराशा पदरी पडली. ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शनं नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रॅविस हेडसोबत मार्शनं संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण सिराजनं ट्रॅविस हेडला २९ धावांवर तंबूत धाडत टीम इंडियाला मोठा दिलासा दिला. अक्षर पटेलनं मिचेल मार्शला ४१ धावांवर बोल्ड केले. दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यावर मॅथ्यू वेड आणि मॅट रॅनशो यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. वॉशिंग्टन सुंदरनं मॅट शॉर्टला ३० धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का दिला. अर्धतक साजरे करणारा मॅट रॅनशोही त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला.  
हर्षित राणाचा 'चौकार'
३८ व्या षटकात हर्षित राणा पिक्चरमध्ये आला. सुरुवातीच्या षटकात विकेटसाठी संघर्ष करणाऱ्या हर्षित राणानं कॅरीच्या रुपात या सामन्यात विकेटच खाते उघडलं. श्रेयस अय्यरनं एका अप्रतिम कॅचसह या विकेटमध्ये मोलाची भूमिका बजावली. हर्षित राणानेच  जोश हेजवूडच्या रुपात शेवटची विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा खेळ २३६ धावांवर खल्लास केला.   विकेट घेत राणानं या सामन्यात चार विकेट्सचा डाव साधला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हर्षित राणा फक्त गंभीरमुळे संघात आहे, अशी टीका झाली होती. या पठ्ठ्यानं ८.४ षटकांत फक्त ३९ धावा खर्च करत चार विकेट्सचा डाव साधत टीकाकारांना कडक प्रत्युत्तर देत गंभीरचा विश्वास सार्थ ठरवल्याचे पाहायला मिळाले.