नवी दिल्ली : विजय हजारे ट्रॉफी २०२२च्या तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आसामचा मधल्या फळीतील फलंदाज रियान परागने अप्रतिम खेळी खेळून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह आसामने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात शुभम खजुरिया आणि हीनान नझीर यांच्या शतकी खेळीच्या जोरावर जम्मू-काश्मीरच्या संघाने ५० षटकात ७ बळी गमावून ३५० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आसामने ४६.१ षटकात ३ गडी गमावून ३५४ धावा केल्या आणि ७ गडी राखून सामना आपल्या नावावर केला. लक्षणीय बाब म्हणजे या सामन्यात एकूण चार शतके झळकावण्यात आली, ज्यामध्ये आसामकडून दोन आणि जम्मू-काश्मीरच्या संघाकडून दोन शतकांचा समावेश आहे.
आसामच्या संघाची उपांत्य फेरीत धडक
या सामन्यात आसामच्या संघाला विजयासाठी ३५१ धावांचे लक्ष्य होते, जे संघाने पूर्ण केले आणि उपांत्य फेरीत धडक मारली. आसामच्या या विजयात संघाचा मधल्या फळीतील फलंदाज रियान परागच्या जबरदस्त फलंदाजीचा मोलाचा वाटा राहिला. रियान परागने ११६ चेंडूत १२ षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने १७४ धावांची खेळी केली, तर ऋषव दासने ११८ चेंडूत एक षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने नाबाद ११४ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली.
जम्मू-काश्मीरच्याही २ खेळाडूंनी ठोकले शतक
जम्मू-काश्मीरकडून संघातील आघाडीच्या दोन फलंदाजांनी शतकी खेळी खेळून संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्याचे काम केले. सलामीवीर फलंदाज शुभम खजुरियाने ८४ चेंडूत ८ षटकार आणि तब्बल १४ चौकारांच्या मदतीने १२० धावांची शानदार खेळी केली, तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हीनान नझीरनेही चांगली फलंदाजी केली. त्याने शुभमसह ५ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने १२४ धावांची खेळी केली. या दोन फलंदाजांशिवाय मधल्या फळीतील फलंदाज फाजिल रशीदने ४६ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"