कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं भारतात ऑक्सिजन, रेमेडीसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा सुरू आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना बेड्स मिळत नाहीत, तर ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. रेमेडीसीवीर इंजेक्शनचाही मुबलक साठाच उपलब्ध आहे, परंतु वाढत्या रुग्णांच्या तुलनेत तो पुरेसा नाही. या सर्व परिस्थितीशी सामन्य जनतेलाच नव्हे तर श्रीमंत वर्गालाही सामना करावा लागत आहे.
भारताचा क्रिकेटपटू उन्मुक्त चंद ( Unmukt Chand) याच्या घरीही कोरोनानं शिरकाव केला आहे. भारतानं २०१२चा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखील जिंकला होता. त्यानं अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १११ धावांची खेळी केली होती. दिल्लीच्या या खेळाडूच्या आईला व काकांना कोरोना झाला आहे आणि त्यांना त्वरीत रेमेडीसीवीर इंजेक्शनची गरज आहे. उन्मुक्तनं ट्विट करून मदतीसाठी आवाहन केलं आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,45,26,609 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,75,649 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शनिवारी (17 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,34,692 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटी 45 लाखांवर पोहोचली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 16,79,740 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,26,71,220 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याच दरम्यान कोरोनातील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.