ठळक मुद्देकोहली हा भारतीय संघाचा कर्णधार असला तरी संघातील युवा खेळाडूंना धोनी हा नेहमीच मार्गदर्शन करताना दिसला आहे.
भारत सध्या क्रिकेट विश्वचषकासाठी संघ बांधणी करताना दिसत आहे. या विश्वचषकात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी खेळणार की नाही, याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. पण भारताला जर आगामी विश्वचषक जिंकायचा असेल तर धोनीला संघात स्थान देणे गरजेचे आहे, त्याच्या शिवाय भारताला पर्याय नाही, असे मत माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले आहे.
कसोटी क्रिकेमधून निवृत्ती पत्करल्यानंतर धोनी एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 संघात बसू शकतो, का यावर चर्चा व्हायला सुरु झाली होती. निवड समितीचे अध्यक्ष एसएसके प्रसाद यांनीही काही महिन्यांपूर्वी धोनीच्या संघसमावेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. पण त्यानंतर धोनीने आपल्या कामिगरीच्या जोरावर प्रसाद यांना चोख उत्तर दिले होते.
कपिल यांनी गुणवत्तेपेक्षा धोनीच्या शांत वृत्तीबाबत यावेळी भाष्य केले आहे. एका संघात कोणतीही गोष्ट कमी किंवा जास्त असता कामा नये, असे कपिल यांना वाटते. भारताचा कर्णधार विराट कोहली हा आक्रमक असल्याचे सर्वांना परिचीत आहे. पण जर संघात आक्रमकताच जास्त असेल तर संघ भरकटू शकतो. त्यामुळे शांतचित्ताने आपली जबाबदारी चोख पार पाडणारा धोनी संघात असायला हवा, असे कपिल यांना वाटते.
कोहली हा भारतीय संघाचा कर्णधार असला तरी संघातील युवा खेळाडूंना धोनी हा नेहमीच मार्गदर्शन करताना दिसला आहे. भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने जेव्हा दक्षिण आफ्रिकेत नेत्रदीपक कामगिरी केली होती, तेव्हा त्याने आपल्या यशामध्ये धोनीचा वाटा असल्याचे जाहीर केले होते. धोनीकडे परिस्थितीनुरुप कामगिरी करवून घेण्याची क्षमता असल्याने त्याचे संघाच्या विजयातील योगदान नेहमीच मोठे राहीले आहे.
जर भारताला विश्वचषक जिंकायचा असेल तर धोनीचे संघात असणे फार महत्वाचे असेल. कारण कोहलीकडे आक्रमकता आहे, तर धोनीकडे शांतपणे परिस्थिती हाताळण्याची क्षमता आहे. धोनीमुळे संघात योग्य समन्वय आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे भारताला विश्वचषकाला गवसणी घालायची असेल तर त्यासाठी धोनीची भूमिका फार महत्वाची असेल, असे कपिल यांनी सांगितले.