Join us  

विजय मिळवायचाय, मग आत्मविश्वासानेच खेळा

जडेजाचा खेळ पाहून न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात त्याने ठोकलेल्या अर्धशतकाची आठवण झाली. स्थिरावलेल्या फलंदाजाप्रमाणे फटकेबाजी करताना पाहून त्याच्या खेळीवर विश्वास दाखवता येईल, असे वाटू लागले आहे. जडेजा आणि पांड्या यांच्यामुळेच भारताला ३०० चा आकडा गाठता आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2020 2:24 AM

Open in App

व्हीव्हीएस लक्ष्मण

वन डे मालिका आधीच गमावल्यामुळे भारताची निराशा झाली होती, मात्र अखेरच्या सामन्यातील थरार भारताने १३ धावांनी जिंकला. या विजयाचा लाभ आज होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यात निश्चितपणे होणार आहे. कर्णधार विराटने नाणेफेकीचा कौल बाजूने येताच फलंदाजी घेतली, तरीही आघाडीच्या फळीने सुरुवात चांगली केली नव्हती. विराटचा अपवाद वगळता कुणीही मोठी खेळी करू शकला नाही. शुभमान गिलची फलंदाजी पाहून मी प्रभावित झालो. तो वेगवान प्रगती करणारा खेळाडू आहे. त्याला याचा पुढे  लाभ होणार आहे. विराटची संयमी खेळी वगळता श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांचे बाद होणे, नाणेफेक जिंकण्याचा लाभ होण्यास पूरक वाटले नाही.

तथापि, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी दमदार भागीदारी केली. दोघांच्या खेळीत समजूतदारपणा आणि जबाबदारीची जाणीव दिसून आली. मुरब्बी फलंदाजांसारखे खेळून पडझड थोपवून लावण्याची क्षमता त्यांनी  सिद्ध केली.हार्दिक या मालिकेत निर्धाराने फलंदाजी करताना दिसतो. मैदानात चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता येथे दिसली. प्रसंगाचे भान राखून खेळण्याची कला त्याने आत्मसात केली. अखेरपर्यंत मोठे फटके मारण्याच्या भानगडीत न पडतादेखील धावसंख्या उभारणीत योगदान देता येते, हे पांड्याने दाखवून दिले. पांड्याच्या फलंदाजीचे वर्णन दौऱ्यात फलंदाजीत गवसलेला  हिरो असेच म्हणावे लागेल.

यानंतर बुमराहचे खरे रूप पाहायला मिळाले. दुर्दैवाने पहिल्या स्पेलमध्ये त्याला गडी बाद करता आला नाही. तथापि, त्याच्या चेंडूतील उसळी प्रतिस्पर्धी फलंदाजांना धडकी भरविणारी होती. जेव्हा बुमराह परतला तेव्हा तो अधिक धोकादायक होता. कसोटी मालिकेत त्याच्याकडून अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. फलंदाजांवर दडपण आणून त्याने बळी घेतले. टी. नटराजनचे पदार्पणदेखील मी अनुभवले.  त्याची कामगिरी कशी होईल, याकडे लक्ष होते. 

टॅग्स :भारतआॅस्ट्रेलिया