Join us

भारतात धावा केल्या नाहीत तर टीका तर होणारच! लोकेश राहुलकडून सौरव गांगुलीला मोठ्या अपेक्षा

दीर्घकाळापासून खराब कामगिरी करीत असलेला राहुलवर टीकेचे प्रहार होत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 06:13 IST

Open in App

कोलकाता :  माजी खेळाडूंनी चांगल्या कामगिरीने राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यासाठी उच्च मापदंड प्रस्थापित केले आहेत. जर त्यानुसार कामगिरी केली नाही, तर प्रत्येक खेळाडूला टीकेला सामोरे जावे लागेल, असे मत माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केले आहे.

टीका टाळण्यासाठी  राहुलला चांगली कामगिरी करावी लागेल. भारतात धावा केल्या नाहीत तर टीकेला सामोरे जावे लागेल, असे दिल्ली कॅपिटल्सच्या आयपीएल प्री-सीझन शिबिरात गांगुली यांनी स्पष्ट केले. ‘जेव्हा तुम्ही भारतात धावा करीत नाही, तेव्हा तुमच्यावर नक्कीच टीका होईल.  राहुल एकटा नाही. याआधीही अनेक खेळाडूंवर टीका झाली आहे. खेळाडूंवर खूप दडपण असते आणि त्यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असते. संघ व्यवस्थापनाला वाटते की, तो संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. अखेर प्रशिक्षक आणि कर्णधार काय विचार करतात, हेदेखील महत्त्वाचे असते,’ असेही गांगुली म्हणाले.

दीर्घकाळापासून खराब कामगिरी करीत असलेला राहुलवर टीकेचे प्रहार होत आहेत. उपकर्णधारपदावरून उचलबांगडी झालेल्या राहुलने गेल्या दहा डावांत २५ हून कमी धावा केल्या. ४७ कसोटींत त्याची धावसरासरी ३५ पेक्षा कमी आहे. यावर भारताकडून ११३ कसोटी आणि ३११ वन डे खेळलेले गांगुली पुढे म्हणाले, ‘राहुलने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केली आहे. पण, अर्थातच तुम्हाला भारताकडून खेळणाऱ्या अव्वल फलंदाजांकडून खूप अपेक्षा आहेत. कारण, इतरांनी उच्च मापदंड स्थापित केले आहेत. जेव्हा तुम्ही काही काळासाठी अपयशी ठरता तेव्हा टीका होणारच. मला खात्री आहे की, राहुलकडे क्षमता असल्याने अधिक संधी मिळतील, तेव्हा तो धावा काढण्याचा मार्ग शोधेल.’

राहुलच्या तंत्रावर बोलताना गांगुली म्हणाले, ‘असमान उसळी असलेल्या खेळपट्टीवर तुम्ही फॉर्ममध्ये नसाल तर  धावा काढणे तुमच्यासाठी आणखी अवघड होत जाते. राहुल अलीकडे वेगवान आणि फिरकी माऱ्यावरही बाद होत आहे.’

शुभमनला प्रतीक्षा करावी लागेल     शुभमन गिलबद्दल गांगुली म्हणाले, ‘शुभमनला भरपूर संंधी मिळतील; पण त्यासाठी त्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. निवडकर्ते, कर्णधार आणि प्रशिक्षक त्याच्याबद्दल विचार करतात. त्याला खूप उच्च दर्जाचे रेटिंग देतात. म्हणूनच शुभमन वन डे आणि टी-२० सामने खेळत आहे. त्याने चांगली कामगिरी केली आहे. पण या क्षणी कदाचित संघ व्यवस्थापनाच्या निर्णयामुळे त्याला बाहेर बसावे लागत आहे.     दोन कसोटी सामने पाच दिवसांत संपल्याबद्दल गांगुली आश्चर्यचकित नाहीत. ही मालिका भारत ४-० ने जिंकेल का? या प्रश्नाच्या उत्तरात गांगुली म्हणाले, ‘ऑस्ट्रेलियाकडे सध्या उच्च दर्जाचे खेळाडू नसल्याने भारतासाठी हे शक्य आहे. हा स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखालील संघ नाही.’

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासौरभ गांगुली
Open in App