Michael Vaughan on Concussion Sub Controversy, Ind vs Eng 4th T20 : भारत आणि इंग्लंड यांच्यात पुण्यात खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात गोलंदाज हर्षित राणाची (Harshit Rana) बरीच चर्चा रंगली. त्याने इंग्लंडचे ३ विकेट्स घेत टीम इंडियाला सामना जिंकून देण्यात मोठी कामगिरी बजावली. हर्षित राणा या सामन्याचा भाग नव्हता. त्याला सामन्याच्या मध्यंतराच्या वेळी शिवम दुबेचा (Shivam Dube) पर्यायी खेळाडू (कन्कशन सब्स्टीट्यूट) म्हणून संघात स्थान मिळाले आणि त्यानंतर त्याने ही कामगिरी केली. पण हर्षितच्या समावेशावरून अनेक प्रश्न निर्माण झाले. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यानेही याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आणि एक मोठा दावा केला.
मायकल वॉनचा दावा
मायकल वॉनने संतप्त प्रतिक्रिया दिली. कन्कशन सब म्हणून संघात कुणाला खेळवायचं हे मॅच रेफरी निश्चित करतात. त्यांनी असं मनात गृहित धरलं की शिवम दुबेने चारही ओव्हर्स टाकल्या असत्या आणि त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी दिली हे न पटणारं आहे. मला या सामन्याच्या मॅच रेफरीचे नाव कळू शकेल का? कारण त्यांनीच निर्णय घेतला की शिवम दुबे खेळला असता तर त्याने ४ षटकं टाकली असती. माझा असा दावा आहे की जर शिवम दुबे खेळला असता आणि त्याने त्याचा ४ ओव्हर्सचा कोटा पूर्ण केला असता तर भारत नक्कीच हरला असता. इंग्लंडच्या फलंदाजांनी नक्कीच आव्हान पार केले असते.
सामन्यात नेमकं काय घडलं?
भारत-इंग्लंड सामन्यातील भारताच्या डावाच्या शेवटच्या षटकात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेमी ओव्हरटनचा चेंडू फलंदाज शिवम दुबेच्या हेल्मेटला लागला. चेंडू हेल्मेटला लागताच टीम इंडियाचे फिजिओ मैदानात आले आणि त्यांनी दुबेची तपासणी केली. दुबे तंदुरुस्त आहे की नाही आणि पुढे खेळू शकतो का हे त्याने पाहिले. डावात फक्त २ चेंडू बाकी होते त्यामुळे दुबे खेळत राहिला. पण जेव्हा टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण सुरू झाले, तेव्हा दुबेच्या जागी हर्षित राणा पर्यायी खेळाडू म्हणून मैदानात आला आणि त्यानंतर बीसीसीआयने अपडेट दिली की हर्षित हा कन्कशन-सब म्हणून संघात घेतला आहे.