रवींद्र चोपडे
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रोहित शर्मा आणि विराट कोहली स्थानिक क्रिकेट खेळणार असतील तर त्यांच्या उपस्थितीचा लाभ अन्य खेळाडूंना होईल, असा विश्वास माजी कर्णधार मोहम्मद अझहरूद्दीन यांनी व्यक्त केला आहे. अझहर यांनी 'लोकमत'शी संवाद साधत दिग्गज खेळाडूंना स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याची सक्ती करणाऱ्या बीसीसीआयचे समर्थनही केले. ते म्हणाले, 'विराट-रोहित सारखे दिग्गज स्थानिक सामने खेळले, तर युवा खेळाडूंना मोठा लाभ होतो.'
मो. सिराज हवा होता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वगळल्याबद्दल अझहर यांनी नाराजी व्यक्त केली. बॉर्डर- गावसकर ट्रॉफी मालिकेत सिराजची कामगिरी दमदार झाल्याकडे लक्ष वेधताना ते म्हणाले, 'भारताचा पराभव खराब फलंदाजीमुळे झाला. सिराजची काय चूक? त्याला कायम ठेवायला हवे होते. जखमेतून सावरलेल्या मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. दीर्घकाळ बाहेर राहिलेल्या शमीला उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल, असे ते म्हणाले. मोरादाबादचे माजी खासदार अझहर हे ९९ कसोटी आणि ३३४ वन-डे खेळले आहेत.