ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड समितीने रोहित शर्माऐवजी शुभमन गिलकडे भारतीय संघाचं कर्णधारपद सोपवलं आहे. तसेच रोहित शर्माचा संघात समावेश करण्यात आला असला तरी त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील कारकीर्द आता अंतिम टप्प्यात आली असल्याचे तसेच तो २०२७ च्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत निवड समितीने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता रोहित शर्माचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, त्यामध्ये रोहित शर्मा २०२७ विश्वचषक खेळायला मिळाला, तर चांगलं होईल, असं सांगताना दिसत आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं होतं. मात्र आता येत्या १९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करताना निवड समितीने भविष्याचा विचार करत भारतीय संघाचं कर्णधारपद रोहित शर्माऐवजी शुभमन गिलकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोहितकडून कर्णधारपद काढून घेत निवड समितीने त्याला एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीबाबत निर्णय घेण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत.
गतवर्षी झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान, कसोटी क्रिकेटमधूनही त्याने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे सध्या रोहित शर्मा केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्येच खेळत आहे. मात्र निवड समितीच्या निर्णयामुळे त्याच्या पुढील कारकिर्दीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच २०२७ साली होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेबाबतचा त्याचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.
काही महिन्यांपूर्वी क्रिकेट पत्रकार विमल कुमार यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये रोहित शर्माने २०२७ च्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्याबाबतची आपली इच्छा व्यक्त केली होती. २०२३ च्या विश्वचषकात अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी २०२७ विश्वचषकात खेळण्याची आणि नेतृत्व करण्याची इच्छा आहे का असे विचारला असता रोहित शर्मा म्हणाला होता की, नक्कीच, २०२७ चा विश्वचषक खेळण्याची माझी इच्छा आहे. तसं झाल्याच २०२३ मध्ये जे काम अपूर्ण राहिलं ते काम पूर्ण करता येईल, दरम्यान, हे उत्तर देताना रोहित शर्मा काहीसा भावूक देखील झाला होता. आता रोहित शर्माचा हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे.