Join us

Arjun Tendulkar Mumbai Indians Playing XI: 'अर्जुन तेंडुलकरला संघात घ्या' अशी मागणी होत असताना भारताचा माजी क्रिकेटपटू म्हणतो... 

मुंबई आणि दिल्ली यांच्यात आज सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 17:54 IST

Open in App

Arjun Tendulkar Mumbai Indians Playing XI: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाचा आज साखळी फेरीतील शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी रंगणार आहे. मुंबई इंडियन्सचा संघ १३ पैकी १० सामने गमावून आधीच प्ले-ऑफच्या स्पर्धेतून बाहेर गेला आहे. आजचा सामना हा दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन संघासाठी महत्त्वाचा असणार आहे. मुंबईने सामना जिंकला तर RCBला पुढची फेरी गाठता येणार आहे. पण मुंबई सामना हारला तर दिल्लीचा प्ले ऑफचा मार्ग मोकळा होईल. अशा वेळी किमान शेवटच्या सामन्यात तरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला संधी मिळावी अशी मागणी सुरू आहे. पण याउलट भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने मात्र वेगळं मत व्यक्त केलं आहे.

"अर्जुन तेंडुलकरला संघात स्थान दिले पाहिजे असं म्हटलं जात आहे. पण माझं मत थोडं वेगळं आहे. जर मुंबई इंडियन्सला वाटत असतं की अर्जुन तेंडुलकर सामना खेळण्यासाठी सज्ज आहे, तर त्यांनी त्याला नक्कीच संघात स्थान दिलं असतं. कदाचित मुंबई संघाला वाटत असावं की तो अद्याप सामना खेळू शकत नाही. जर एखाद्याला खेळाडूला संधी द्यायचीच असेल, तर एखादा कर्णधार मुद्दाम शेवटच्या सामन्यापर्यंत वाट का बघेल?" अशा शब्दांत कैफने अर्जुनच्या मुद्द्यावर रोहितची पाठराखण केली.

"आजचा सामना मुंबई जिंकेल"

"जर अर्जुन तेंडुलकर सर्वोत्तम ११ खेळाडूंपैकी एक असता तर त्याला कधीच संघात घेतलं असतं. रोहित शर्मा हा एक परिपक्व कर्णधार आहे. केवळ शेवटचा सामना शिल्लक आहे म्हणून एखाद्या खेळाडूला संधी देऊन पाहू, असा विचार रोहितच्या डोक्यात कधीच येणार नाही. आजचा सामना जरी शेवटचा असला तरी या सामन्यात मुंबई आपला सर्वोत्तम संघ उतरवेल आणि सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल", असा विश्वास मोहम्मद कैफने व्यक्त केला. 

मुंबई-दिल्ली सामन्यावर RCB चं Playoffs चं भवितव्य

विराट माजी कर्णधार असलेल्या RCB संघाचे सध्या १४ सामन्यात १६ गुण आहेत. पण त्यांचा नेट रन रेट -०.२५३ आहे. हीच त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. कारण आता यंदाच्या साखळी फेरीच्या सामन्यांपैकी केवळ दिल्लीचा संघ RCB एवढे गुण मिळवू शकतो. दिल्ली कॅपिटल्स सध्या १३ सामन्यांत १४ गुणांवर आहेत. त्यांचा नेट रन रेट +०.२५५ इतका आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाने त्यांना पराभूत केलं तरच RCB ला पुढील फेरीचं तिकीट मिळेल. पण दिल्लीचा संघ जिंकला तर RCB थेट स्पर्धेबाहेर जाईल.

टॅग्स :आयपीएल २०२२अर्जुन तेंडुलकरमुंबई इंडियन्सरोहित शर्मा
Open in App