Join us

ICC World Twenty20 : ... अन् पाकिस्तानच्या चाहत्यांचा पोपटच झाला, आयसीसीने काढली 'विकेट'

ICC World Twenty20 : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, पाकिस्तानी क्रिकेट संघ आणि पाकिस्तानी क्रिकेट चाहते यांना स्वतःहून ट्रोल होण्याची सवयच झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 15:07 IST

Open in App
ठळक मुद्देमहिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी आयसीसीने घेतला पोलपाकिस्तान संघाने नाव नसल्याने चाहत्यांची टीकाआयसीसीच्या एका ट्वीटने चाहत्यांची बोलती बंद

मुंबई : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, पाकिस्तानी क्रिकेट संघ आणि पाकिस्तानी क्रिकेट चाहते यांना स्वतःहून ट्रोल होण्याची सवयच झाली आहे. पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाची चषकावरून चाहत्यांसह आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही ( ICC) खिल्ली उडवली होती. मात्र यावेळी ICC ने पाकिस्तानच्या चाहत्यांचा पोपट केला. वेस्ट इंडिज येथे सुरू असलेल्या आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोण जाणार याबाबत ट्विटरवर मतदान घेतले. त्यावरून पाकिस्तानी चाहत्यांनी आयसीसीला जाब विचारण्यास सुरुवात केली, परंतु आयसीसीच्या एका उत्तराने त्यांची विकेटच पडली.

आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत गतविजेता वेस्ट इंडिजसह माजी विजेता ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारत यांनी धडक दिली आहे. त्यापैकी कोणत्या संघांमध्ये जेतेपदाचा सामना होईल, यासाठी आयसीसीने मतदान घेतले. त्यात पाकिस्तान संघाचे नाव का नाही, असा सवाल चाहत्यांकडून केला जाऊ लागला. काहींनी आयसीसीवर शेलक्या भाषेत टीकाही केली. 'B' गटात पाकिस्तानचा संघाला भारताकडून पराभव पत्करावा लागला. भारताने साखळीतील चारही सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताने पाकिस्तानसह न्यूझीलंड, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.आयसीसीच्या पोलवर पाकिस्तानच्या चाहत्यांनी नाराजी प्रकट केली. त्यांनी आयसीसीला जाब विचारण्यास सुरुवात केली. आश्चर्याची बाब म्हणजे पाकिस्तानचा संघ साखळी फेरीतच गारद झाला आहे. त्यामुळे त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश करता आलेला नाही. तरीही एका चाहत्याने अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान समोरासमोर येतील अशी भविष्यवाणी करून टाकली. पाकिस्तानी चाहत्यांच्या सर्व प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आयसीसीने गमतीशीर उत्तर देत चाहत्यांचा पोपट केला. उपांत्य फेरीत भारतासमोर इंग्लंडचे आणि विंडीजसमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे. 

टॅग्स :आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपआयसीसीपाकिस्तान