Join us  

भारतीय संघाचे तीन फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार असावेत का? गौतम गंभीर म्हणतो...

भारतीय क्रिकेट संघाबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून एक गोष्ट सातत्यानं बोलली जात आहे किंवा त्याबाबत चर्चा सुरू आहे ती म्हणजे क्रिकेटच्या तीन फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार असावेत की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 3:19 PM

Open in App

भारतीय क्रिकेट संघाबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून एक गोष्ट सातत्यानं बोलली जात आहे किंवा त्याबाबत चर्चा सुरू आहे ती म्हणजे क्रिकेटच्या तीन फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार असावेत की नाही?. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मातब्बर संघांनी आता या रणनितीचा स्वीकार देखील केला आहे. पण भारतीय संघात वन-डे, कसोटी आणि टी-२० सामन्यांसाठी सध्या एकच कर्णधार आहे. क्रिकेटच्या तीन प्रकारात वेगवेगळ्या खेळाडूंकडे नेतृत्व देण्याच्या रणनितीबाबत माजी सलामीवीर गौतम गंभीर यााला विचारण्यात आलं असता त्यानं याची अगदीच काही गरज वाटत नाही, असं मत व्यक्त केलं आहे. एका हिंदी वृत्त वाहिनीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात तो बोलत होता. 

"क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगवेगळा कर्णधार असायला हवं हे काही अगदीच गरजेचं वाटत नाही. जर एखादा कर्णधार तुम्हाला चांगला रिझल्ट देत आहे तर त्याच्यावर विश्वास ठेवून तीनही प्रकारात त्याच्याकडेच कर्णधारपद ठेवणं चांगलंच आहे", असं गौतम गंभीर म्हणाला. पण इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या संघांनी वेगवेगळ्या कर्णधारांची रणनिती स्वीकारलेली आहे. बदलत्या परिस्थितीनुसार संघ देखील तितकाच मजबूत होतो. त्यामुळे अशावेळी भारतीय कसोटी संघाची जबाबदारी एका कर्णधारावर देण्याचाही विचार करता येऊ शकेल, असंही गंभीर म्हणाला. 

भारतीय कसोटी क्रिकेटचा संघासाठी एक कर्णधार आणि एकदिवसीय, टी-२० सामन्यांसाठी दुसऱ्या एका खेळाडूवर कर्णधारपदाची जबाबदारी देता येऊ शकते, असं मत गंभीर यानं व्यक्त केलं आहे. यात गौतम गंभीरनं शिखर धवनच्या नावाचाही उल्लेख केला. शिखर धवन याची श्रीलंका दौऱ्यासाठीच्या भारतीय संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळे कर्णधार असावेत हे काही गरजेचं नाही, असं मत गंभीरचं असलं तरी याकडे एक मजबूत रणनिती म्हणून पाहता येऊ शकेल असंही तो पुढे म्हणाला. 

टॅग्स :गौतम गंभीरबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघविराट कोहली