ICC World Cup Qualifier : झिम्बाब्वेला वर्ल्ड कप स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर फेकणाऱ्या स्कॉटलंडला आज पात्रता स्पर्धेतून बाद व्हावे लागले. विजयासाठी ४४ षटकांत २७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्सची अवस्था वाईट झाली होती. पण, बॅस डे लीडने कमाल केली. त्याने साकिब जुल्फिकार सह सहाव्या विकेट्ससाठी शतकी भागीदारी केली आणि ऐतिहासिक विजय मिळवला. बॅस डे लीडने एकाच वन डे सामन्यात ५ विकेट्स व १०० धावा करणारा जगातील चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी, रोहन मुस्ताफा ( १०९ व ५-२५ वि. PNG), पॉल कॉलिंगवूड ( ११२* व ६-२१ वि. बांगलादेश ) आणि व्हिव्ह रिचर्ड्स ( ११९ व ५-४१ वि. न्यूझीलंड) यांनी असा पराक्रम केला.
झिम्बाब्वेला वर्ल्ड कप स्पर्धेबाहेर करणाऱ्या स्कॉटलंडने पात्रता स्पर्धेतील महत्त्वाच्या लढतीत नेदरलँड्समोर २७८ धावांचे लक्ष्य ठेवले. नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करण्याचे ठरवले. लोगान व्हॅन बिकने पहिल्याच षटकात स्कॉटलंडचा सलामीवीर मॅथ्यू क्रॉसला भोपळ्यावर माघारी पाठवले. ख्रिस्तोफर मॅकब्रिज व ब्रेंडन मॅक्म्युलेन यांनी स्कॉटलंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु मॅकब्रिज ३२ धावांवर बॅस डे लीडच्या गोलंदाजीवर माघारी परतला. जॉर्ज मुन्सीही ( ९) अपयशी ठरला. मॅक्म्युलेन व कर्णधार रिची बेरिंग्टन यांनी चांगली खेळी केली. बेरिंग्टनने ६४ धावा चोपल्या. मॅक्म्युलन याने ११० चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह १०६ धावा केल्या. थॉमस मॅकिंतोषने नाबाद ३८ धावा करताना संघाला ९ बाद १७७ धावापर्यंत पोहोचवले. बॅस डे लीगने १० षटकांत ५१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.
नेदरलँड्सला वर्ल्ड कपची पात्रता निश्चित करण्यासाठी हे लक्ष्य ४४ षटकांत पार करावे लागणार होते. विक्रमजीत सिंग आणि मॅक्स ओ'डोवड यांनी आक्रमक सुरूवात करून दिली. ६५ धावांची ही भागीदारी मिचेल लिस्कने तोडली अन् मॅक्स २० धावांवर माघारी परतला. ७ धावांच्या अंतराने विक्रमजीतही ( ४०) लिस्कच्या गोलंदाजीवर बाद झाला. स्कॉटलंडने आता सामन्यावर पकड घेण्यास सुरूवात केली. विस्ली बारेसी ( ११) व तेजा निदामनुरू ( १०) हेही बाद झाल्याने नेदरलँड्सची अडचणी वाढली. कर्णधार स्कॉट एडवर्डने ( २५) बॅस डे लीडसह डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु मार्क वॅटने त्याची विकेट मिळवली. डे लीड आणि साकिब जुल्फिकार यांनी सावध सुरूवातीनंतर हात मोकळे करण्यास सुरूवात केली.