Join us

दक्षिण आफ्रिकेच्या ICC World Cup 2023 खेळण्याच्या स्वप्नांना धक्का; ICCची कारवाई अन् हुकणार थेट प्रवेशाची संधी 

ICC World Cup 2023 : भारतात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये  वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे आणि त्यात थेट प्रवेशाची संधी आता संपत चालली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 10:53 IST

Open in App

ICC World Cup 2023 : भारतात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये  वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे आणि त्यात थेट प्रवेशाची संधी आता संपत चालली आहे. दक्षिण आफ्रिकेला या वर्ल्ड कप मध्ये थेट प्रवेश मिळवण्याची आयती संधी चालून आली होती, परंतु आता ICC ने त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेत थेट प्रव्श मिळवण्याच्या त्यांच्या स्वप्नांना मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात आफ्रिकेनं षटकांची गती संथ राखल्याने ICCने त्यांचे गुण कापले अन् तिथेच मोठे संकट ओढावले.

दक्षिण आफ्रिकेनं तीन सामन्यांची ही वन डे मालिका २-१ अशी जिंकली. तिसऱ्या व शेवटच्या वन डे सामन्यांत त्यांना ५९ धावांनी हार मानावी लागली. हा सामना जिंकला असता तर ते आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीगमध्ये  ( ICC Men's Cricket World Cup Super League) आठव्या स्थानावर सरकले असते. पण, त्यांना आता नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. त्यात आयसीसीने कारवाई करताना त्यांचा एक गुण कापला अन् आता वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या थेट पात्रतेच्या शर्यतीत श्रीलंकेकडून त्यांना आव्हान मिळणार आहे. दक्षिण आआफ्रिकेवर दुसऱ्यांदा अशी कारवाई करण्यात आली आहे. 

सुपर लीगमधील अव्वल ८ संघांना वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. भारतीय संघ यजमान असल्याने ते आधीच पात्र ठरले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांची मालिका रद्द केल्याचा आफ्रिकेला सर्वात मोठा फटका बसला आहे. प्रत्येक सामन्यात विजयी संघाला १० गुण मिळतात, सामना बरोबरीत/रद्द झाल्यात दोन्ही संघांना प्रत्येकी ५ गुण दिले जातात. आफ्रिकेच्या खात्यात ७८ गुण आहेत आणि त्यांच्या मागे १० गुणांच्या फरकाने श्रीलंका आहे. त्यांना न्यूझीलंड दौऱ्यावर तीन वन डे सामने खेळायचे आहेत.

दक्षिण आफ्रिकेला नेदरलँड्सविरुद्ध मार्च-एप्रिलमध्ये दोन वन डे सामन्यांची मालिका खेळायची आहे आणि त्यामुळे आठव्या स्थानासाठी तगडी स्पर्धा आहे. उर्वरित दोन संघांसाठी दहा संघ वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धेत खेळतील. यात सुपर लीगमधील तळाचे पाच संघ आणि संलग्न संघटनेचे पाच संघ यांच्यात स्पर्धा होईल. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :आयसीसीद. आफ्रिका
Open in App