मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) पाच सदस्यीय निवड समितीने सोमवारी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. लोकेश राहुल, विजय शंकर आणि दिनेश कार्तिक हे अनपेक्षित चेहरे संघात पाहायला मिळाले, तर रिषभ पंत आणि अंबाती रायुडू यांना डच्चू देण्यात आला. बीसीसीआयने संघ जाहीर केल्यानंतर काही वेळातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी) रायुडूला का वगळले, असा सवाल केला.
![]()
आयसीसीने शेअर केलेल्या फोटोत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या सरासरीसह रायुडूच्या कामगिरीची तुलना केली. कर्णधार विराट कोहली 59.57 च्या सरासरीने अव्वल स्थानावर आहे. महेंद्रसिंग धोनी ( 50.37) आणि रोहित शर्मा ( 47.39) हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. या यादीत रायुडू 47.05 च्या सरासरीने चौथ्या स्थानावर आहे आणि विशेष म्हणजे रायुडूची सरासरी महान फलंदाज सचिन तेंडुलकरपेक्षा ( 44.83) जास्त आहे. असे असताना रायुडूला का वगळले, असा सवाल आयसीसीने केला आहे.
निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी भारतीय संघ जाहीर केला. यावेळी त्यांनी शंकरला का निवडले हेही सांगितले. ते म्हणाले,'' चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आम्ही मधल्या फळीसाठी अनेक पर्याय वापरून पाहिले. त्यात दिनेश कार्तिक, श्रेयस अय्यर, मनीष पांडे यांचा समावेश होता. त्याशिवाय आम्ही
अंबाती रायुडूलाही अनेक संधी दिल्या, परंतु विजय शंकरचा आम्ही अष्टपैलू म्हणून वापर करू शकतो.
![]()
तो फलंदाजी व गोलंदाजीही करू शकतो, तसेच तो उत्तम क्षेत्ररक्षकही आहे. चौथ्या स्थानासाठी शंकरचा आम्ही विचार करत आहोत.''
2018च्या आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर रायुडूने भारताच्या वन डे संघात पुनरागमन केले. त्याने आशिया चषक व वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली, परंतु ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यात त्याला छाप पाडता आली नाही. रायुडूने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 14 डावांत 42.18च्या सरासरीने 464 धावा केल्या आहेत.