ठळक मुद्देइंग्लंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया मैदानावर उतरेल ती ऑरेंज जर्सीमध्ये. राजकीय मैदानावर या रंगाने थोडा बेरंग केला आहे.हा 'ऑरेंज' नेमका कुठून आला, याबाबत आयसीसीच्या एका सूत्राने खुलासा केला आहे.
यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत आत्तापर्यंत अपराजित असलेली टीम इंडिया रविवारी, ३० जूनला यजमान इंग्लंडशी दोन हात करणार आहे. विराटसेनेनं विजयाचा सिलसिला सुरूच ठेवून जेतेपदावरील दावा आणखी पक्का करावा, असं भारतीयांना नक्कीच वाटतंय. पण, हा सामना वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय ठरलाय. ते कारण आहे, भारतीय संघाच्या जर्सीचा बदललेला रंग.
'मेन इन ब्लू' म्हणून ओळखली जाणारी टीम इंडिया रविवारी मैदानावर उतरेल ती ऑरेंज जर्सीमध्ये. बीसीसीआयनं कालच या जर्सीचं अनावरण केलं आणि संघातील शिलेदारांचे फोटोही समोर आले. या जर्सीत आपले सगळे वीर खुलूनच दिसताहेत, पण राजकीय मैदानावर या रंगाने थोडा बेरंग केला आहे. भाजपाचं भगव्या रंगाशी असलेलं नातं पाहून काही विरोधकांना भगव्या रंगाची जर्सी खटकली आहे. परंतु, या भगव्या रंगाचा भाजपा किंवा अन्य कुठल्याही संघटनेशी-पक्षाशी काही संबंध नसल्याचं आयसीसीमधील एका सूत्रानं एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीतून स्पष्ट झालं आहे. हा 'ऑरेंज' नेमका कुठून आला, याबाबतही त्यानं खुलासा केला आहे.
![]()
'टीम इंडियाची नवी जर्सी अमेरिकेतील डिझायनर्सनी तयार केली आहे. हे डिझाइन करताना, चाहत्यांना अगदीच वेगळं, अनोळखी वाटू नये, असा विचार झाला. टीम इंडियाच्या जुन्या टी-२० जर्सीमध्ये ऑरेंज पट्ट्या आहेत. सध्याच्या जर्सीची कॉलर आणि त्यावरचं 'इंडिया' हे नावही ऑरेंज रंगात आहे. त्यामुळे या रंगसंगतीत थोडी अदलाबदल करून डिझाइन्स केली गेली. ती बीसीसीआयला पाठवण्यात आली आणि त्यांनी सर्वोत्तम डिझाइन निवडलं', असं आयसीसीतील सूत्राने एएनआयला सांगितलं.
![]()
भारतानेच जर्सीचा रंग का बदलायचा?; इंग्लंडने का नाही?
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या जर्सीचा रंग निळा आहे. त्यामुळे एका संघाला आपल्या जर्सीचा रंग बदलावा लागणार आहे. यावेळी भारतानेच का जर्सीचा रंग बदलायचा, इंग्लंडने आपल्या जर्सीचा रंग बदलावा, असं काही जणांचे म्हणणं आहे. पण नियमानुसार यजमान संघाच्या जर्सीचा रंग बदलला जात नाही. 'अवे टीम'ला नव्या रंगाची जर्सी वापरावी लागते.
![]()
भारताविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानने त्यांच्या नेहमीच्या निळ्या रंगाच्या जर्सीऐवजी लाल आणि निळ्या कॉम्बिनेशनची जर्सी वापरली होती. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नेहमीपेक्षा वेगळी जर्सी वापरली होती.
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज या संघांच्या जर्सींचा रंग कुठल्या कुणाच्याही जर्सींशी मिळताजुळता नसल्यानं त्यांना जर्सी बदलावी लागलेली नाही.