लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019भारत वि. पाकिस्तान : वर्ल्ड कप स्पर्धेतील ज्या सामन्याची आतुरतेनं वाट पाहिली जात होती तो भारत-पाकिस्तान सामना अवघ्या एका दिवसानंतर होणार आहे. भारत-पाकिस्तान म्हटलं की ठसन आलीच... ती मैदानावरही असते आणि मैदानाबाहेरही. पण, हा सामना सुरू होण्यापूर्वीच दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये जोरदार संघर्ष झालेला पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानच्या शोएब अख्तरनं या सामन्यासाठी भारतीय संघाच्या सांगण्यानुसार खेळपट्टी तयार करण्यात आल्याचा आरोप केला. त्यावर भारताच्या वीरेंद्र सेहवागनं दिलेलं उत्तर ऐकून अख्तरची बोलतीच बंद झाली. जाणून घेऊया नक्की काय घडलं?
सध्याच्या गुणतालिकेनुसार भारतीय संघ पाच गुणांसह तिसऱ्या, तर पाकिस्तान 3 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. भारत-पाक सामन्यापूर्वी अख्तर व सेहवाग हे एका यू ट्युब चॅनेलवर आमनेसामने आले आणि त्यात हा वाद झाला. यावेळी भारत-पाक सामना हा वर्ल्ड कप फायनल पूर्वीचा फायनल सामना आहे का, असे शोएबनं विचारले. त्यावर सेहवाग म्हणाला,''ही लढत फायनलपूर्वीची फायनल नाही, पण वर्ल्ड कप फायनलपेक्षा कमी नक्की नाही. 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत हा थरार अनुभवायला मिळाला होता. त्यामुळे मीडियात या सामन्याची अधिक चर्चा आहे आणि त्यांनीच या लढतीला फायनलचे स्वरुप प्राप्त करून दिलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीप्रमाणे वर्ल्ड कप स्पर्धेतही जेतेपदाचा मुकाबला या दोन संघांत झाला, तर तो सामना पाहायला वेगळीच मजा येईल.''
भारताने या वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांना हवी तशी खेळपट्टी बनवून घेतली आहे, असे मत अनेक क्रिकेटपटूंनी व्यक्त केलं आहे. हे असं कसं असू शकतं. ही गोष्ट खरी आहे का?, अख्तरच्या या प्रश्नावर सेहवाग खवळला. तो म्हणाला,''हे तथ्य असल्याचं तुलाही वाटतं. लोकांचं कामच ते आहे. मी एवढचं म्हणेन, हत्ती डौलानं चालत असताना कुत्रे भुंकत असतात. खेळपट्टी कशी असावी, हे आमच्या हातात असतं तर त्यावर जराही गवत दिसलं नसतं.''