Join us  

ICC World Cup 2019 : भारतीय चाहत्यांच्या चुकीसाठी कोहलीनं मागितली माफी, नेमकं काय घडलं?

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरीची नोंद करणाऱ्या भारतीय संघाने रविवारी विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 9:06 AM

Open in App

ओव्हल, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. ऑस्ट्रेलिया : वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरीची नोंद करणाऱ्या भारतीय संघाने रविवारी विजय मिळवला. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूनं लागल्यानं विराट कोहलीची बाजू वरचढ ठरली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 352 धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी हळुहळू का होईना हा डोंगर सर करण्याच्या दृष्टीनं पाऊल टाकले होते, परंतु भारतीय गोलंदाजांनी कामगिरीचा आलेख उंचावत त्यांना रोखले. भारताने 36 धावांनी हा सामना जिंकला आणि ऑस्ट्रेलियाची सलग दहा सामन्यांतील अपराजीत मालिका खंडित झाली. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 316 धावांत तंबूत परतला. पण, या सामन्यानंतर कोहलीनं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथची माफी मागितली. नेमकं असं काय घडलं?

या सामन्यात भारतीय खेळाडूंनी चाहत्यांची मनं जिंकली, परंतु कोहलीच्या एका कृतीनं ऑसी चाहत्यांनाही आपलंसं केलं. चेंडु कुरतडण्या प्रकरणात स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांच्यावर बंदीची कारवाई झाली होती. स्मिथ व वॉर्नर एका वर्षाच्या बंदीच्या कारवाईनंतर राष्ट्रीय संघात परतले, परंतु चाहत्यांच्या मनात त्यांच्याबद्दलचा राग अजूनही कायम आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत त्याची प्रचिती वारंवार येत आहे. स्टेडियमवर उपस्थित चाहते स्मिथ व वॉर्नर यांची हुर्यो उडवत आहे.

भारतीय चाहत्यांनाही तसं करणं आवरलं नाही. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात ओव्हल मैदानावर भारतीय चाहत्यांचीच संख्या अधिक होती आणि त्यांनी कांगारूंच्या खेळाडूंना डिवचण्याची संधी दवडली नाही. क्षेत्ररक्षण करत असताना भारतीय चाहते स्मिथची हुर्यो उडवत होते. त्यांच्या या कृत्यावर कोहली नाराज झाला आणि त्यानं चाहत्यांना तसं न करण्याचं आवाहन केलं. कोहलीच्या या कृतीनं सर्वांचीच मनं जिंकली. पण, चाहत्यांचं असं वागणं कोहलीच्या मनाला बोचत होतं आणि त्यामुळेच सामन्यानंतर त्यानं पत्रकारपरिषदेत चाहत्यांच्या वतीनं स्मिथची माफी मागितली. 

तो म्हणाला,''त्याची हुर्यो उडवली जावी, असं त्यानं काहीच केलेलं नाही. झालेल्या चुकीची त्यानं माफी मागितली आहे आणि शिक्षा पूर्ण करून त्यानं पुनरागमन केलं आहे. त्यामुळे त्याची हुर्यो उडवण्याची काहीच गरज नव्हती. चाहत्यांच्या अशा वागण्यानं मला वाईट वाटलं आणि त्यांच्या वतीनं मी स्मिथची माफी मागतो.''

टॅग्स :वर्ल्ड कप 2019विराट कोहलीस्टीव्हन स्मिथभारतआॅस्ट्रेलिया