Join us

ICC World Cup 2019 : रोहितला चुकीचे बाद देणे पडले महागात, फॅन्सने अंपायरचा विकिपीडियाच बदलला

ICC World Cup 2019 :भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात चुकीच्या पद्धतीने बाद ठरवण्याचा निर्णय अंपायरच्या चांगल्याच अंगलट आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 17:51 IST

Open in App

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मालावेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात चुकीच्या पद्धतीने बाद ठरवण्याचा निर्णय अंपायरच्या चांगल्याच अंगलट आला. रोहितला (18) सहाव्या षटकात झेलबाद होऊन माघारी परतावे लागले होते. केमार रोचच्या गोलंदाजीवर तो यष्टिरक्षक शे होप्सच्या हाती झेल देऊन बाद झाला. पण, त्याला बाद देण्यावरून नवी चर्चा सुरू झाली आहे. रोचने टाकलेला इनस्विंग रोहितच्या बॅट अन् पॅडच्या मधून थेट यष्टिरक्षकाच्या हातात विसावला. मैदानावरील पंचांनी यावर निकाल दिला नाही पण विंडीजनं तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. तिसरा पंच मायकेल गॉफ यांनी रोहितला बाद दिले, पण त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. रोहितच्या एका चाहत्यानं तर गॉफ यांचा विकिपीडियाच बदलण्याचा पराक्रम केला. 

तिसऱ्या पंचाकडे दाद मागितल्यानंतर चेंडू बॅट अन् पॅडच्या मधून जाताना दिसत होता. पण, तो बॅटीला चाटून गेली की पॅडला याबाबत स्पष्टता नव्हती, तरीही तिसऱ्या पंचांनी रोहितला बाद दिले आणि नेटिझन्सने टीकेची झोड उठवली. रोहित नाबाद असल्याचे दिसत असूनही पंचानी त्याला बाद ठरवले. हा सामना रोहितची पत्नी रितिकाही पाहत होती. रोहितला तिसऱ्या पंचांनी बाद दिल्यावर रितिका चांगली भडकली होती. या गोष्टीच्या रिप्लेमध्ये अल्ट्रा एज वापरण्यात आले होते. पण यामध्येही रोहित आऊट आहे किंवा नाही हे स्पष्ट होत नव्हते. रोहितने शुक्रवारी याचा पुरावा देणारे एक ट्विट केले. एका चाहत्यानं तर गॉफ यांचा विकिपीडिया पेजच बदलला. त्यात त्यानं इंग्लंडला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी गॉफ यांनी रोहितला बाद केले, असे नमूद केले.

दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानेवेस्ट इंडिजवर दममाखदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघ 11 गुणांसह उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 268 धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाटलाग करताना वेस्ट इंडिजचे फलंदाज मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा यांच्या वेगवान गोलंदाजीचे शिकार ठरले. भारताच्या अचूक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजला भारताचे आव्हान पेलवले नाही आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर 125 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

रोहित शर्माचं पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणारं ट्विट, नेटिझन्सचा पाठिंबा

टॅग्स :वर्ल्ड कप 2019रोहित शर्मावेस्ट इंडिजभारत