Join us  

ICC World Cup 2019 : पाकिस्तानसह 'हे' सात देश भारताच्या पुढे, कसा जिंकणार वर्ल्ड कप?

ICC World Cup 2019: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या वर्षभरात दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांना त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 11:36 AM

Open in App

मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या वर्षभरात दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांना त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम केला. परदेशातही विराटसेनेनं वर्चस्व गाजवलं आणि म्हणूनच आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदाच्या दावेदारांत भारतीय संघ आघाडीवर आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे पासून वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पण, कोणत्याही संघाचे यश हे खेळाडूंची तंदुरुस्ती आणि फॉर्म यावर अवलंबून असते. याच बाबतीत भारतीय संघ पिछाडीवर आहे आणि ही विराटसाठी डोकेदुखी ठरू शकते. विशेष म्हणजे भारतापेक्षा पाकिस्तानचे खेळाडू तंदुरुस्त आहेत, अशा परिस्थितीत भारतीय संघ खरचं वर्ल्ड कप जिंकेल का, हा प्रश्न उपस्थित राहत आहे.

खेळाडूंच्या तंदुरुस्तीची चाचपणी करण्यासाठी जगभरात यो-यो टेस्ट घेतली जाते. ज्याचा स्कोर अधिक तो तंदुरुस्त खेळाडू... भारतीय संघाचा कर्णधार कोहली हा सर्वात तंदुरुस्त खेळाडू म्हणून ओळखला जातो. पण,  जगातील अन्य खेळाडूंसोबत तुलना केल्यास कोहली पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक ग्रॅन ल्युडेन यांनी नुकतीच आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत पाक खेळाडूंनी यो-यो चाचणीत दमदार कामगिरी केल्याचे सांगितले. 

पाकिस्तानी खेळाडूंनी तंदुरुस्तीच्या बाबतीत भारतीय खेळाडूंना मागे टाकले आहे. पाकिस्तान संघातील 26 वर्षीय मोहम्मद रिझवानने यो-यो चाचणीत 21 गुण, तर 24 वर्षीय गोलंदाज हसन अलीनं 20 गुण मिळवले आहेत. जगातील सर्वोत्तम फलंदाज कोहलीला या चाचणीत 19 गुण मिळाले होते. कोहली हा भारतीय संघातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू आहे. भारताच्या वरिष्ठ आणि भारत A संघात स्थान मिळवण्यासाठी यो-यो चाचणीत 16.1 गुणांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तर पाकिस्तान संघाने हीच मर्यादा 17.4 इतकी ठेवली आहे. 

यो-यो चाचणीत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंना सर्वाधिक गुणांची कमाई करावी लागते. त्यांना 20.1 गुणांची कमाई करावी लागते. वेस्ट इंडिज व इंग्लंड या संघांचा क्रमांक येतो आणि यो-यो चाचणीत त्यांच्यासमोर 19 गुणांचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिका (18), श्रीलंका ( 17.4), पाकिस्तान ( 17.4) आणि भारत ( 16.1) अशी क्रमवारी येते.  

वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा पहिला मुकाबला 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019बीसीसीआयभारतविराट कोहलीपाकिस्तानआॅस्ट्रेलियान्यूझीलंडश्रीलंकाइंग्लंडवेस्ट इंडिज