- व्हीव्हीएस लक्ष्मण लिहितात...
भारतीय संघाने अफगाणिस्तान व वेस्ट इंडिजविरुद्ध आपल्या क्षमतेच्या केवळ ७० टक्के कामगिरी केली. तरी या दोन्ही लढतींमध्ये भारतीय संघाला आपली छाप सोडण्यात यश आले. त्याचे मुख्य कारण म्हणजे विराट कोहली अॅन्ड कंपनीकडे असलेले अचूक गोलंदाजी आक्रमण हे आहे. भारतीय संघात कुठल्याही स्थितीत बळी घेण्याची क्षमता असलेले नियमित गोलंदाज आहेत. याव्यतिरिक्त पाचवा गोलंदाज म्हणून हार्दिक पांड्या छाप सोडण्यास उत्सुक असतो. गेल्या लढतीत मोहम्मद शमीने ज्या चेंडूवर शाई होपला बाद केले तो चेंडू या लढतीतील ‘मॅजिक बॉल’ होता. चिंतेचा खरा विषय फलंदाज आहे. शिखर धवनच्या अनुपस्थितीत संघाची फलंदाजीची भिस्त बऱ्याचअंशी रोहित शर्मा व कोहली यांच्यावर अवलंबून आहे. गेल्या तीन डावांमध्ये के. एल. राहुल चांगली सुरुवात केल्यानंतरही आपल्या चुकीमुळे बाद झाला. अफगाणिस्तानविरुद्ध अर्धशतकी खेळी केल्यानंतरही केदार जाधवला अद्याप सूर गवसलेला नसल्याचे दिसून येते. खेळपट्टीवर जम बसवण्यासाठी तो संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे.
विजय शंकर छोट्याशा कारकिर्दीमध्ये कर्णधार कोहलीसोबत मिळालेल्या दोन सुवर्णसंधींचा लाभ घेण्यात अपयशी ठरला, ही निराशाजनक बाब आहे. धोनीच्या फलंदाजीबाबत चर्चा करताना त्याने विंडीजविरुद्ध आपल्या खेळीमध्ये अखेरच्या षटकात वेगाने धावा केल्या, पण सुरुवातीला त्याने अनेक चेंडू वाया घालवले. अशा स्थितीत पांड्या जर अपयशी ठरला तर भारताच्या चिंतेत भर पडू शकते.
मी कोहलीच्या नेतृत्वशैलीने प्रभावित झालो आहे. क्षेत्ररक्षण व गोलंदाजी क्रमामध्ये योग्य तो बदल बघताना तो दिग्गज कर्णधार म्हणून वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे. भारतीय संघाला इंग्लंडचा पराभव करीत स्पर्धेतील अन्य दावेदारांवर छाप सोडण्याची चांगली संधी आहे. इंग्लंड सलग पराभवांमुळे चिंतेत आहे. संघाची फलंदाजी संथ खेळपट्टीवर पूर्णपणे अपयशी ठरली आहे. इंग्लंडने वन-डे क्रमवारीतील अव्वल क्रमांकही गमावला आहे.