Join us

ICC World Cup 2019 : भारताच्या सरावावर पावसाचं पाणी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीवरही सावट?

ICC World Cup 2019 : भारतीय संघाची वर्ल्ड कप स्पर्धेतील वाटचाल झोकात सुरू आहे. आतापर्यंत पाच सामन्यांत चार विजय व एक सामना अनिर्णीत राखत भारतीय संघ 9 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 15:04 IST

Open in App

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाची वर्ल्ड कप स्पर्धेतील वाटचाल झोकात सुरू आहे. आतापर्यंत पाच सामन्यांत चार विजय व एक सामना अनिर्णीत राखत भारतीय संघ 9 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याची सर्वाधिक संधी भारतीय संघालाच आहे. भारतीय संघ गुरुवारी वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. 

या सामन्यात वेस्ट इंडिजकडे गमावण्यासारखे काहीच राहिलेले नाही. त्यामुळे ते त्यांची संपूर्ण ताकद पणाला लावून स्पर्धेचा निरोप घेण्यापूर्वी बलाढ्य संघांना धक्का देण्याचे काम नक्की करू शकतील. पण, भारतीय संघानेही त्यांचा कंबर कसली आहे. पण, मंगळवारी भारताच्या सराव सत्रावर पावसानं पाणी फिरवलं... त्यामुळे प्रत्यक्ष सामन्याच्या दिवशीही पाऊस व्यत्यय आणेल का, असा प्रश्न उपस्थित राहत आहे.

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्याविरुद्ध विजय मिळवले, तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी घाम गाळावा लागला. सलामीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मधल्या फळीची कसोटी या सामन्यात लागली. त्यात कर्णधार विराट कोहली व केदार जाधव वगळता अन्य फलंदाजांना अपयश आले. 

अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करताना भारताच्या धावगतीला चाप बसवला. त्यांनी भारताला 224 धावांवरच समाधान मानण्यास भाग पाडले. लक्ष्याचा पाठलाग करतानाही अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. मोहम्मद शमीनं अखेरच्या षटकात हॅटट्रिक घेऊन भारताचा विजय पक्का केला. त्यामुळे या सामन्यातील चुका सुधारून पुन्हा भरारी घेण्यासाठी भारतीय संघाला सज्ज रहावे लागणार आहे.

दुसरीकडे वेस्ट इंडिजचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टातच आले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्यांनी जो खेळ दाखवला तो पाहून भारतासाठी हा सामना सोपा नक्की नसेल. किवींच्या 291 धावांचा पाठलाग करताना कार्लोस ब्रॅथवेटनं केलेल्या वादळी खेळीनं सर्वांची मनं जिंकली. पण, विंडीजला अवघ्या 5 धावांनी पराभव पत्करावा लागला. पण, या सामन्यानं त्यांच्यातला आत्मविश्वास नक्की परतला असेल. सहा सामन्यांत त्यांना केवळ एकच विजय मिळवता आलेला आहे. 

मँचेस्टर येथील सामन्यासाठी मंगळवारच्या सराव सत्रावर पावसानं पाणी फिरवले असले तरी गुरुवारी पावसाची शक्यता फार कमीच आहे.

 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतवेस्ट इंडिज