Join us  

क्रिकेट विश्वचषक 2019: बीसीसीआयपुढे आयसीसी नमली; भारतीय संघाच्या वेळापत्रकात बदल

भारताचा पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध; 4 जूनला भिडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 7:07 PM

Open in App

कोलकाता: भारतीय क्रिकेट संघ 2019 च्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात 4 जूनपासून करणार आहे. या सामन्यात भारतीय संघासमोर दक्षिण आफ्रिकेचं आवाहन असेल. भारताच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात 2 जूनपासून होणार होती. मात्र लोढा समितीच्या शिफारशींनुसार, आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 15 दिवसांचे अंतर असणं गरजेचं आहे. पुढील वर्षी 30 मे ते 14 जुलै या कालावधीत युनायटेड किंग्डममध्ये विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आयसीसीच्या अधिकाऱ्यांची कोलकात्यात बैठक झाली. यामध्ये आयसीसीनं भारतीय खेळाडूंचा व्यस्त कार्यक्रम लक्षात घेत विश्वचषकाच्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल केले. त्यामुळे बीसीसीआयपुढे आयसीसीनं नमतं घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.  या बैठकीत सहभागी झालेल्या बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर पुढील वर्षातील भारतीय संघाच्या वेळापत्रकाची माहिती दिली. 'पुढील वर्षी 29 मार्च ते 19 मे या कालावधीत आयपीएल स्पर्धा होईल. त्यानंतर लगेचच विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होईल. मात्र या दोन्ही स्पर्धांमध्ये आम्हाला 15 दिवसांचं अंतर ठेवायला लागेल. विश्वचषक स्पर्धा 30 मेपासून सुरू होत आहे. दोन स्पर्धांमध्ये 15 दिवसांचं अंतर राखण्यासाठी 4 जूनला स्पर्धेतील पहिला सामना खेळेल. याआधी भारतीय संघ 2 जूनला पहिला सामना खेळणार होता. मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे,' असं बैठकीला उपस्थित असलेल्या बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.  आयसीसीकडून आयोजित केल्या जाणाऱ्या अनेक स्पर्धांची सुरुवात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानं होते. या सामन्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं आयसीसीनं अनेक स्पर्धांची सुरुवात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानं केली आहे. विश्वचषक स्पर्धा 2015 आणि चॅम्पियन्स करंडक स्पर्धा 2017 ची सुरुवात भारत-पाकिस्कान सामन्यानं झाली होती. 'भारत आणि पाकिस्तान सामन्यानं स्पर्धेची सुरुवात होणार नाही, असं पहिल्यांदाच घडणार आहे,' अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं दिली. ही स्पर्धा रॉबिन राऊंड पद्धतीनं होणार आहे. त्यामुळे सर्वच संघ एकमेकांविरोधात खेळतील. 1992 च्या विश्वचषक स्पर्धेत याच पद्धतीनं सामने झाले होते.  

टॅग्स :बीसीसीआयआयसीसीभारतपाकिस्तान