लंडन - पहिले दोन्ही सामने जिंकत भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेतील आपल्या अभियानाला दणक्यात सुरुवात केली आहे. पहिल्या दोन लढतीत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे. मात्र भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. या विजयांमुळे हुरळून न जाता खेळावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा विराटचा प्रयत्न आहे. तसेच विश्वचषक विजेतेपदाविषयी आताच काही बोलणे जरा घाईचे होईल, असे विराटने सांगितले.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर आता भारतीय संघासाठी उपांत्यफेरीची वाट मोकळी झाली आहे का? अशी विचारणा विराटकडे करण्यात आली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना विराट म्हणाला,"भारतीय संघाच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाबाबत आताच काही बोलणे घाईचे ठरेल. किमान सहा सामन्यांनंतर भारतीय संघ स्पर्घेत नेमका कुठल्या स्थानावर आहे हे स्पष्ट होईल."
"ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय भारतीय संघासाठी आत्मविश्वासाच्या दृष्टीने आवश्यक होता. कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्याच्या इराद्याने आम्ही या लढतीत उतरलो होतो. कारण याआधी झालेल्या द्विपक्षीय मालिकेत सुरुवातीला घेतलेल्या आघाडीनंतरही आम्हाला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान आमच्यासमोर होते. त्यामुळेच आम्ही या लढतीत भक्कम इराद्यांनिशी उतरलो. आमची सलामीची भागीदारी उत्तम झाली. मलाही काही धावा जमवता आल्या. तसेच हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंह धोनी यांनी ज्यापद्धतीने फलंदाजी केली ती जबरदस्त होती.'' असे विराटने सांगितले.
स्पर्धेच्या सुरुवातीलाच तुल्यबळ संघांशी झालेल्या लढती ह्या संघाच्या दृष्टीने चांगल्याच होत्या, असेही विराट म्हणतो. प्रबळ संघांविरुद्ध सुरुवातीलाच खेळणे हे चांगलेच आहे कारण या सामन्यांत विजय मिळवल्यास आमची उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची शक्यता वाढेल.