लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आज-उद्या करता करता अखेर वर्ल्ड कप स्पर्धा सुरू झाली. यजमान इंग्लंडने धडाक्यात सुरुवात करताना दक्षिण आफ्रिकेवर 104 धावांनी मात करून विजयी सलामी दिली. इंग्लंडच्या खेळाडूंनी तीनही आघाड्यांवर साजेशी कामगिरी करताना आफ्रिकेचा संपूर्ण संघ 207 धावांत गुंडाळला. इंग्लंडने 311 धावांचा डोंगर उभा केला होता. पण, या सामन्यात मैदानाबाहेर एक नाव चर्चेत होत आणि ते म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचं.
या सामन्यातून तेंडुलकरने नव्या इनिंगला सुरुवात केली. तेंडुलकर प्रथमच समालोचकाच्या भूमिकेत दिसला आणि त्याने तेथेही आपली जादू दाखवली. समालोचकाच्या रूममध्ये तेंडुलकरसह वीरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली यांना पाहून नेटिझन्स भलतेच आनंदी झाले. या त्रिकुटाच्या एकत्र येण्याने 15 वर्षांपूर्वीचा एक किस्सा जीवंत झाला. सेहवागने सोशल मीडियावर त्या प्रसंगाला जीवंत केले.
नेटिझन्सनेही सेहवागच्या ट्विटवर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. 15 नोव्हेंबर 2003चा हा सामना. न्यूझीलंडविरुद्ध हैदराबाद येथे झालेल्या दिवस-रात्र वन डे सामन्यात एकाच वेळी सेहवाग, तेंडुलकर आणि गांगुली एकत्र मैदानावर दिसले होते. तेंडुलकर आणि सेहवाग या दोघांनी शतकी खेळी केली होती आणि 30 षटकात 182 धावांची सलामी दिली होती. तेंडुलकर 81 चेंडूंत 102 धावा करून माघारी परतला. त्यानंतर गांगुली मैदानावर आला. गांगुलीनं 21 चेंडूंत 33 धावा चोपल्या. त्या सामन्यात गांगुलीला दुखापत झाल्याने रनर म्हणून तेंडुलकर पुन्हा मैदानावर परतला. त्यावेळी तीघेही मैदानावर फलंदाजाच्या भूमिकेत एकत्र दिसले होते. सेहवागने 130 चेंडूंत 134 धावा केल्या होत्या.
![]()
पाहा व्हिडीओ...