Join us  

ICC World Cup 2019 : ... अन् वर्ल्ड कप स्पर्धेत आली जान; आता खरा रणसंग्राम!

ICC World Cup 2019: वन डे क्रिकेट हे अनप्रेडिक्टेबल का आहे त्याची प्रचिती काल आली असेल...

By स्वदेश घाणेकर | Published: June 22, 2019 11:09 AM

Open in App

- स्वदेश घाणेकरवन डे क्रिकेट हे अनप्रेडिक्टेबल का आहे त्याची प्रचिती काल आली असेल... इंग्लंड- श्रीलंका सामना म्हणजे एकतर्फी होणार, यजमान इंग्लंड सहज बाजी मारणार आणि उपांत्य फेरीचा प्रवेश पक्का करणार, हे साधं गणित सर्वांनी बांधलेलं.. इंग्लंडही लल्लू पल्लू संघाचा सामना करायचाय याच आविर्भावात होते.. श्रीलंकेला २३२ धावांत रोखल्यावर त्यांची छाती आणखी फुलली.. पण हा भ्रमाचा भोपळा फुटला, श्रीलंकेने यजमान व जेतेपदाचे प्रबळ दावेदार इंग्लंडला पराभवाची चव चाखवली... 

२३३ हे आव्हान तसं इंग्लंडसाठी काहीच नव्हते.. सातत्याने ३००-३५०+ धावा करणाऱ्या इंग्लंडसाठी हा सोपा सामना होता. पण श्रीलंकेच्या खेळाडूंची स्तुती करायला हवी. पावसामुळे दोन सामने वाया गेल्यानंतरही आणि पराभवाचे भूत पाठीवर बसलेले असताना त्यांनी बलाढ्य इंग्लंडला नमवले. लसिथ मलिंगाने सर्व अनुभव पणाला लावला, त्याला अन्य गोलंदाजांची योग्य साथ मिळाली, सर्व काही आज जुळून आले आणि श्रीलंकेने विजय पक्का केला. जो रूटची विकेट खऱ्या अर्थाने टर्निंग पॉईंट ठरली. बेन स्टोक्सने त्याच्या परीनं लढा दिला, परंतु समोर आयाराम गयारामचे सत्र सुरू राहिल्याने त्यालाही अपयश आले..

या विजयाने श्रीलंकी खूप काही कमावले, तर इंग्लंडने गमावले.. दोन सामने पावसाने वाया गेल्यानंतर श्रीलंकेच्या आशा संपुष्टातच होत्या. पण आजचा विजय त्यांना नवसंजीवनी देणारा ठरला. आता त्यांना पुढील तीन सामन्यांत दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि भारत यांचा सामना करावा लागणार आहे. यापैकी दोन विजय त्यांच्या उपांत्य फेरीच्या अशा कायम राखू शकतात.. इंग्लंडविरुद्ध विजय मिळवून मिळवलेला आत्मविश्वास त्यांच्या पुढील वाटचालीसाठी कामी नक्की येईल.. 

पण दुसरीकडे इंग्लंडने सुरुवातीचे सोपे पेपर सोडवत उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल केली होती. पण लंकेनं त्यांचा घात केला. आता त्यांना उर्वरीत तीन सामन्यांत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि भारत यांचा सामना करायचा आहे. हे आव्हान वाटतं तितक सोपं नसेल. आतापर्यंत एकही विजय मिळवण्यात अपयशी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनेही मागील सामन्यात न्यूझीलंडला घाम फोडला होता. केन विलियम्सन टिकला नसता तर किवींचा पराभव निश्चित होता. 

बांगलादेशकडे दुलर्क्ष करून चालणार नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 330 धावा, इंग्लंड व न्यूझीलंडविरुद्ध अनुक्रमे 280 व 244 धावा, तर वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियासारख्या कट्टर प्रतिस्पर्धींविरोधात त्यांनी अनुक्रमे 322 व 333 धावा चोपल्या आणि त्याही धावांचा पाठलाग करताना. त्यांना कमी लेखणं हे कोणत्याही बलाढ्य संघाला स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आजच्या निकालाने वर्ल्ड कप स्पर्धेत जीव ओतला आहे. पिक्चर अभी बाकी है... येतो ट्रेलर था !!! 

भारताचा मार्ग सोपा?भारताचे पाच सामने शिल्लक आहेत आणि त्यापैकी तीन विजय त्यांच्यासाठी पुरेसे आहेत. अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, बांगलादेश, श्रीलंका आणि इंग्लंड हे भारताचे पुढील प्रतिस्पर्धी आहेत. इंग्लंड वगळता अन्य संघ क्रमवारीत खालच्या स्थानावर असले तरी त्यांना केमी लेखणे भारताला महागात पडू शकते. इंग्लंडच्या पराभवानं भल्याभल्या संघाच्या डोळ्यात अंजन घातलं हे नक्की. 

चौघात पाचवा...भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे चार संघ उपांत्य फेरीत आघाडीवर होते. पण श्रीलंकेनेही आता त्यात मुसंडी मारली आहे. त्यामुळे स्पर्धेत आणखी एक मोठा अपसेट उपांत्य फेरीचे समीकरण बदलू शकतो..

टॅग्स :वर्ल्ड कप 2019इंग्लंडभारतआॅस्ट्रेलियान्यूझीलंडश्रीलंकाबांगलादेशद. आफ्रिका