लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : अफगाणिस्तानवर विजय मिळवत पाकिस्तानने विश्वचषकातील आपले आव्हान कायम राखले आहेत. त्याचबरोबर त्यांनी इंग्लंडला मागे सारत गुणतालिकेत चौथे स्थानही पटकावले आहे. आतापर्यंत पहिल्यांदाच पाकिस्तानचे चाहते भारताच्या विजयासाठी दुवा मागतील. कारण रविवारी भारत आणि इंग्लंड यांच्यमध्ये सामना होणार आहे. हा सामना भारताने जिंकावा, असे पाकिस्तानला वाटत असेल. कारण या सामन्यात जर इंग्लंडचा संघ पराभूत झाला तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते, त्याचबरोबर पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याचा आशा उंचावतील.
इंग्लंडला मागे टाकत पाकिस्तान चौथ्या स्थानावर दाखल
अखेरच्या षटकात अफगाणिस्तानवर विजय मिळवत पाकिस्तानने आपले विश्वचषकातील आव्हान कायम ठेवले आहे. कारण या विजयासह पाकिस्तानने 9 गुणांची कमाई करत चौथे स्थान पटकावले आहे. इंग्लंडचे आतापर्यंत आठ गुण आहेत, त्यामुळे त्यांची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यावर साऱ्यांनाच नजरा असतील.
अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या नाट्यपूर्ण लढतीत अखेर अफगाणिस्तानवरपाकिस्तानने विजय मिळवत आपले आव्हान कायम राखले. अफगाणिस्ताननेपाकिस्तानपुढे 228 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग पाकिस्तानने अखेरच्या षटकात केला.

अफगाणिस्तानच्या 228 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला चांगली सुरुवात करता आली नाही. मोहम्मद नबी, मुजीब उर रेहमान आणि रशिद अली यांनी पाकिस्तानचा अर्धा संघ गारद केले आणि त्यांच्यावर दडपण आणले.
तत्पूर्वी अफगाणिस्तानने नाणेफक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पण शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीपुढे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. आफ्रिदीने यावेळी चार विकेट्स मिळवत अफगाणिस्तानचे कंबरडे मोडले. पण असगर अफगाण आणि नजिबुल्ला झारदान यांच्या प्रत्येकी 42 धावांच्या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजी करताना 227 धावा करता आल्या.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यांची स्टेडियममध्येच हाणामारी
आज विश्वचषकात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये सामना रंगत आहे. पण हा सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात सुरु असताना दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये जोरदार हाणामारी पाहायला मिळाली. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना सुरळीत सुरु होता. पण यावेळी अशी एक घटना घडली की, या दोन्ही देशांतील चाहते एकमेकांवर तुटून पडले. या दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले.
नेमके प्रकरण घडले तरी काय...
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सामना सुरु होता. यावेळी मैदानावरून एक अनधिकृत विमान गेले. या विमानावर 'जस्टिस फॉर बलूचिस्तान' हे शब्द मोठ्या अक्षरांत लिहिले गेले होते. हे शब्द दोन्ही देशांतील चाहत्यांनी पाहिले आणि त्यांच्यामध्ये जोरदार मारामारी सुरु झाली.
हे विमान होते तरी कोणाचे...
लीड्सच्या मैदानावरून विमान गेल्यावर ही मारामारी सुरु झाली. पण हे विमान नेमके होते तरी कोणाचे, याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. लीड्स एयर ट्रॅफिक विभागाला याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी लीड्स एयर ट्रॅफिक विभागाला या विमानाबाबत कोणतीही माहिती मिळाली नव्हती.