Join us

ICC World Cup 2019 : पाकिस्तान विजयी लय कायम राखण्यास, तर गतविजेते ऑस्ट्रेलिया विजयपथावर परतण्यास इच्छुक

ICC World Cup 2019 : यजमान इंग्लंडला नमवून इतर संघांमध्ये धडकी भरवणारा पाकिस्तान बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हात करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 08:47 IST

Open in App

टॉन्टन : यजमान इंग्लंडला नमवून इतर संघांमध्ये धडकी भरवणारा पाकिस्तान बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हात करणार आहे. जगज्जेत्यांना नमवून विजयी लय कायम राखण्याचा पाकचा इरादा असून भारताकडून पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलियापुढे विजयी पथावर परतण्याचे आव्हान असेल.

सुरुवातीला अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध विजय नोंदविणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारताने धूळ चारली. दुसरीकडे पाकच्या विश्वचषकाच्या मोहिमेची सुरुवात खराब झाली. विंडीजविरुद्ध १०५ धावांत गारद झालेला हा संघ सात गड्यांनी हरला. दुसऱ्या सामन्यात मात्र जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या आयसीसी क्रमवारीतील अव्वल इंग्लंडला पाकने १४ धावांनी नमवले. लंकेविरुद्धचा त्यांचा सामना पावसात वाहून जाताच दोन्ही संघात गुणविभागणी झाली होती.पाक संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या १४ पैकी केवळ एका सामन्यात विजयी ठरला. या धर्तीवर कर्णधार सर्फराज अहमद याने ऑस्ट्रेलयाविरुद्ध विजयासाठी इंग्लंडवरील विजय प्रेरणास्पद ठरणार असल्याचे सांगितले. दोन अर्धशतके ठोकणाऱ्या डेव्हिड वॉर्नर तसेच स्टीव्ह स्मिथ यांच्याकडून ऑस्ट्रेलियाला मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. भारताविरुद्ध मंद खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज धावा काढण्यात अपयशी ठरले होते. कर्णधार अ‍ॅरोन फिंच याने वॉर्नरचा बचाव केला. भारताच्या गोलंदाजांनी त्याला टार्गेट केल्यामुळे आम्ही अपयशी ठरलो, असे फिंच पराभवानंतर म्हणाला होता. वॉर्नर आणि स्मिथ हे पाकविरुद्ध दमदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा कर्णधाराने व्यक्त केली आहे. 

हेड-टू-हेड

  • दोन्ही संघांदरम्यान १०३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने झाले असून ऑस्ट्रेलियाने ६७, तर पाकिस्तानने ३२ सामने जिंकले आहेत. एक सामना टाय झाला असून ३ सामने अनिर्णित राहिले.
  • दोन्ही संघांमधील शेवटच्या पाच लढतीमधील सर्व सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत.
  • दोन्ही संघ विश्वचषकामध्ये ९ वेळा आमनेसामने आले असून ५ सामने ऑस्ट्रेलियाने, तर चार सामने पाकिस्तानने जिंकले आहेत.
  • ऑस्ट्रेलियाने पाच वेळा विश्वचषक जिंकला असून पाकिस्तानने एकदा विश्वचषक जिंकला आहे.
  • विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियाने पाकविरुद्ध ३१०, तर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरूद्ध २८६ धावा अशी सर्वाेच्च धावसंख्या उभारली आहे.
  • ऑस्ट्रेलियाची पाकिस्तानविरुद्ध १३३ धावांची नीचांकी खेळी असून पाकिस्तानची नीचांकी धावसंख्या १३२ आहे. 
टॅग्स :वर्ल्ड कप 2019आॅस्ट्रेलियापाकिस्तान