ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. त्यामुळे चाहते पावसाला शिव्यांची लाखोली वाहत आहेत. पण हा सामना सुरु होण्यासाठी पाऊस हे मुख्य कारण नाही. कारण गेल्या दीड तासांमध्ये ट्रेंट ब्रिजमध्ये जास्त पाऊस पडलेला नाही. पाऊस नसतानाही सामना अजूनही सुरु का होत नाही, हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल. पण हा सामना पावसामुळे नाही तर एका कारणामुळे उशिरा सुरु होत आहे.
पाऊस थांबल्यावर साधारणत: अर्ध्या किंवा जास्तीत जास्त एका तासामध्ये सामना सुरु केला जातो. पण इंग्लंडमध्ये मात्र तसे होताना दिसत नाही. पावसामुळे मैदान निसरडे झाले आहे, त्याचबरोबर काही ठिकाणी थोडा चिखलही झाला आहे. पंचांनी मैदानाची पाहणी करताना काही गोष्टी निदर्शनास आणून दिल्या आहेत.
![]()
यावेळी भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर म्हणाला की, " इंग्लंडपेक्षा भारतामध्ये जोरदार पाऊस होतो. इडन गार्डन्स हे भारतातील सर्वात मोठे मैदान आहे. भारताच्या एका सामन्याला येथे पाऊस पडला होता. पण पाऊस थांबल्यावर अर्ध्या तासात सामना सुरु झाला. ही गोष्ट इंग्लंडमध्ये पाहायला मिळत नाही."
इंग्लंडमध्ये मैदानाचा पावसापासून बचाव करण्यासाठी भारतापेक्षा चांगली उपकरणे आहेत. पण तरीही त्यांना मैदान सुकवता आलेले नाही. त्यासाठी खास उपाय योजना करताना इंग्लंडचे ग्राऊंड्समन दिसत नाहीत. त्यामुळेच या सामन्याला विलंब होत असल्याचे म्हटले जात आहे.
पाऊस थांबल्यावर पंचांनी केली मैदानाची पाहणी, अन्...
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात पावसाने काही काळ विराम घेतला. त्यामुळे पंचांनी मैदानाची पाहणी केली. पीच वगळता मैदानावरील सर्व कव्हर्स काढण्यात आली. त्यानंतर दोन्ही पंचांनी मैदानाची पाहणी केली. मैदानाच्या काही भागात थोडा चिखल झाला होता. त्याबरोबर मैदान निसरडे झाल्याचे पाहायला मिळाले. पंचांनी पाहणी केल्यावर आता काही वेळातच सामना सुरु होईल, असे चाहत्यांना वाटतले, पण...
दोन्ही पंच मैदानात आले तेव्हा पाऊस पूर्णपणे थांबला होता. दोन्ही पंचांनी संपूर्ण मैदान पाहिले. त्यावेळी मैदानातील काही भागांतील पाणी अजूनही साफ करण्यात आले नव्हते. त्याचबरोबर मैदानात चालतानाही पंचांना समस्या जाणवत होती. आता ग्राऊंडस्टाफ या परिस्थितीला कसे सामोरे जातो, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
पंचांनी मैदानाची पाहणी केली आणि त्यानंतर थोड्याच वेळात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कव्हर्स पुन्हा आणावे लागले आणि पुन्हा एकदा सामना सुरु होणे लांबणीवर पडले.
Web Title: ICC World Cup 2019: Not due to rain, but due to 'this' reason the match is not likely to happen
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.