लॉर्ड्स, आयसीसीवर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या पाकिस्तान संघाने विजयी निरोप घेतला. पाकिस्तानने अखेरच्या साखळी सामन्यात बांगलादेशवर 94 धावांनी विजय मिळवला. शाहिन आफ्रिदीने 35 धावांत 6 विकेट घेतल्या. वर्ल्ड कप स्पर्धेत एकाच सामन्यात पाच विकेट घेणारा तो युवा गोलंदाज ठरला. पाकिस्तानने विजयासाठी ठेवलेल्या 316 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 221 धावांत तंबूत परतला. या विजयासह पाकिस्तान संघाने 11 गुणांची कमाई करून वर्ल्ड कप स्पर्धेचा निरोप घेतला. पाकिस्तान व न्यूझीलंड यांच्या खात्यात प्रत्येकी 11 गुण होते, परंतु किवींचा नेट रन रेट ( 0.715) हा पाकपेक्षा ( -0.430) चांगला असल्याने त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात घडलेल्या एका प्रसंगावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) पाकच्या मोहम्मद हाफिजची चांगलीच फिरकी घेतली. 
फाखर  जमान ( 13) स्वस्तात माघारी परतल्यानंतर इमाम उल हक व बाबर आझम यांनी 157 धावांची भागीदारी करून पाकिस्तानला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करून दिली. बाबरला शतकानं हुलकावणी दिली. त्यानं 98 चेंडूंत 96 धावा केल्या. इमामने शतकी खेळी केली. पण, पाकिस्तानच्या धावांचा वेग हा अपेक्षेपेक्षा कमी होता. मधल्या व तळाच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यानं पाकिस्तानला 50 षटकांत 9 बाद 315 धावा करता आल्या.  लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ 44.1 षटकांत 221 धावांत तंबूत परतला. शाकिब अल हसन (64) वगळता बांगलादेशच्या अन्य फलंदाजांना अपयश आले. वर्ल्ड कप स्पर्धेत सलग 8 सामन्यांत 40+ धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. 
या सामन्यात हाफिजने 27 धावा केल्या, तर गोलंदाजीत 6 षटकांत 32 धावा दिल्या. एका षटकात त्याच्या हातून चेंडू निसटला आणि तो हवेत विसावला. याच प्रसंगावरून आयसीसीनं खास व्हिडीओ तयार केला आणि हाफिजचा तो चेंडू थेट अंतराळात पोहोचवला.