लंडन, आयसीसीवर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ओव्हल येथे सलामीचा सामना रंगणार आहे. 30 मे ते 14 जुलै या कालावधीत इंग्लंड आणि वेल्स येथील 11 स्टेडियम्सवर एकूण 48 सामने खेळली जातील. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. पण, यंदाची वर्ल्ड कप स्पर्धा ही या पाच कारणानं वेगळी असणार आहे. इंग्लंड पाचव्यांदा वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भूषवित आहे. यापूर्वी त्यांनी 1975, 1979, 1983 आणि 1999 मध्ये वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन केले होते. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पाच अशा गोष्टी आहेत की ज्या प्रथमच पाहायला मिळतील.
वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच पूर्ण सदस्य असलेल्या दोन सदस्यांना मुख्य स्पर्धेत स्थान पटकावण्यात अपयश आले. झिम्बाब्वे व आयर्लंड हे पूर्ण सदस्य आहेत.
इंग्लंडमध्ये प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेत डे नाईट सामन्याचे आयोजन होणार आहे. 1979 सालापासून वन डे क्रिकेटमध्ये डे नाईट सामने खेळवण्यास सुरूवात झाली. 1992साली वर्ल्ड कप स्पर्धेत पहिला डे नाईट सामना खेळवण्यात आला. पण, इंग्लंडमध्ये प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेत डे नाईट सामना खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडने 1975, 1979, 1983 आणि 1999 मध्ये वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन केले होते. पण, तेव्हा डे नाईट सामने खेळवण्यात आले नव्हते. यंदा एकूण 7 डे नाईट सामने खेळवण्यात येणार आहेत.
धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप स्पर्धेत मागील 18 सामन्यांत एकदाही पराभवाचे तोंड पाहावे लागलेले नाही. 23 मे 1999 मध्ये त्यांना पाकिस्तानविरुद्ध धावांचा पाठलाग करताना अपयश आले होते.