बर्मिंगहॅम - विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी भारताने बांगलादेशवर मिळवलेल्या विजयामध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने केलेली भेदक गोलंदाजी निर्णायक ठरली होती. सामन्यात चार बळी घेणाऱ्या बुमराने बांगलादेशच्या शेपटाची अखेरच्या षटकांमधील वळवळ अचूक यॉर्करच्या जोरावर संपुष्टात आणत भारताल 28 धावांनी विजय मिळवून दिला होता. दरम्यान, बुमराने आपल्या अचूक आणि भेदक यॉर्करमागील गुपित उघड केले आहे.
बुमराने सामन्यानंतर सांगितले की एक दोन वेळा सराव करून अचूक यॉर्कर टाकता येत नाही. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. मी नेहमी तेच करतो. मी जेव्हा नेटमध्ये सराव करत असतो. तेव्हा प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी करतो. मग सुरुवातीच्टा षटकांमध्ये नव्या चेंडूच्या सहाय्याने गोलंदाजी करायची असे वा शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठ तयार व्हायचे असो मी नेहमीच मेहनत घेतो. ''
अचूक यॉर्कर टाकण्यासाठी खूप तयारी आवश्यक असते. तुम्ही जितकी जास्त तयारी कराल तेवढेच यॉर्कर अचूक पडतात. तुम्ही यात तरबेज होऊ शकत नाही. पण तुम्ही तुमच्यात सातत्याने सुधारणा करू शकता. यॉर्कर चेंडू हा अन्य चेंडूंसारखाच असतो, ज्याप्रकारे तुम्ही लेंथ बॉल टाकता तसाच यॉर्कर चेंडू असतो. असेही त्याने यावेळी स्पष्ट केले.