लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध नेहमीच तणावाचे राहिलेले आहेत. त्यामुळेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना युद्धासारखाच काही जणांना भासतो. पण सध्याच्या घडीला एक भारताचा चाहता पाकिस्तानचा सपोर्ट करत असल्याचे पाहायला मिळाले आहे.
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना आज क्रिकेटची पंढली समजली जाणाऱ्या लॉर्ड्सवर खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान भारताच्या एका चाहत्याने आपण पाकिस्तानला सपोर्ट करत असल्याचे म्हटले आहे. या फोटोमध्ये भारताच्या चाहत्याबरोबर पाकिस्तानची एक मुलगी आणि मुलगादेखील आहे.
पाकिस्तान तीनशे पार, बाबर आणि हारिस यांची दमदार फलंदाजी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३०८ धावा केल्या आहेत. बाबर आझम आणि हारिस शेख यांनी दमदार अर्धशतकी खेळी साकारल्यामुळेच पाकिस्तानला तिनशे धावांचा आकडा पार करता आला.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पाकिस्तानने यावेळी ८१ धावांची सलामी दिली. पण त्यानंतर १६ धावांमध्ये हे दोन्ही सलामीवीर बाद झाले. या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडले ते ताहिरने. पाकिस्तानचा सलामीवीर फझर झमानला ताहिरने पहिल्यांदा बाद केले. त्यानंतर ताहिरने इमाम उल हकचा काटा काढला. पण इमाम उल हकला बाद केल्यावर ताहिरने इतिहास रचला.

पाकिस्तानने दोन्ही फलंदाज बाद झाल्यावर बाबर आझमने संघाचा धावफलक हलता ठेवला. आझमने ८० चेंडूंत सात चौकारांच्या जोरावर ६९ धावा केल्या. आझम आणि हारिस यांची भागीदारी यावेळी चांगलीच रंगली होती. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी रचली. पण यानंतर आझम बाद झाला. आझम बाद झाल्यावर हारिसने जोरदार हल्ले गोलंदाजीवर चढवले. हारिसने ५९ चेंडूंत ९ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ८९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

इम्रान ताहिरने या सामन्यात दोन विकेट्स मिळवत इतिहास रचला. आतापर्यंत विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रम वेगवान गोलंदाज अॅलन डोनाल्डच्या नावावर होता. आतापर्यंत डोनाल्डने विश्वचषकात सर्वाधिक ३८ बळी मिळवले होते. पण या सामन्यात ताहिरने दोन बळी मिळवत विश्वचषकात एकूण ३९ बळी मिळवण्याची किमया साधली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रम आता ताहिरच्या नावावर झाला आहे.