Join us  

धोनीच्या ग्लोव्ह्जवरून पेटली लढाई, फॅन्सकडून सोशल मीडियावर आयसीसीची धुलाई 

विश्वचषकातील सलामीच्या लढतीमधील भारतीय संघाच्या खेळापेक्षा महेंद्र सिंह धोनीने यष्टीरक्षण करताना वापरलेल्या ग्लोव्ह्जचीच सध्या अधिक चर्चा सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 12:14 PM

Open in App

मुंबई - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या लढतीत दणदणीत विजय मिळवत भारतीय क्रिकेट संघाने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील आपल्या अभियानाची धडाकेबाज सुरुवात केली आहे. मात्र  या लढतीमधील भारतीय संघाच्या खेळापेक्षा महेंद्र सिंह धोनीने यष्टीरक्षण करताना वापरलेल्या ग्लोव्ह्जचीच सध्या अधिक चर्चा सुरू आहे. एकीकडे आयसीसीने या ग्लोव्हजवर आक्षेप घेत हे ग्लोव्ह्ज वापरू नयेत म्हणून सांगितले आहे. मात्र आयसीसीच्या या आदेशावर सोशल मीडियामधून जोरदार टीका सुरू आहे. #DhoniKeepTheGlove हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंड होत आहे. तसेच बीसीसीआय आणि काही माजी क्रिकेटपटूंनीही धोनीला समर्थन दिले आहे. या विवादाबाबत प्रतिक्रिया देताना बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राज यांनी सांगितले की, आम्ही आमच्या खेळाडूंसोबत उभे आहोत. धोनीच्या ग्लोव्ह्जवर जे चिन्ह आहे, ते कुठल्याही धर्माचे प्रतीक नाही. तसेच ते चिन्ह म्हणजे कुठलीही जाहिरात नाही, असेही राय यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत परवानगी घेण्याचा प्रश्न उपस्थित झाल्यास आम्ही हे ग्लोव्हज धोनीला वापरण्याबाबत परवानगी देण्याची विनंती आयसीसीला करू, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.  

धोनीने वापरलेल्या या ग्लोव्जवर असे कोणते चिन्ह आहे, ज्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेलच. धोनीचे ग्लोव्ज हे हिरव्या रंगाचे आहेत. या ग्लोव्जवर पांढऱ्या रंगात एक चिन्ह आहे. हे चिन्ह भारतीय आर्मीतील असल्याचे म्हटले जात आहे. आयसीसीने याबाबत म्हटले आहे की, " आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळाडू जे पेहराव परीधान करताता किंवा जी उपकरण वापरतात त्याबाबत काही नियम आहेत. पेहराव आणि उपकरणांवर राजकीय किंवा धार्मिक गोष्टी असू नयेत, असे आम्हाला वाटते. याबाबत आम्ही बीसीसीआयला विनंती केली आहे." दरम्यान, सोशल मीडियावर आयसीसीच्या या निर्णयाविरोधात वातावरण तापले आहे. तर अनेक माजी खेळाडूंनीही धोलीना समर्थन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कुस्तिपटू योगेश्वर दत्त आणि सुशील कुमार यांनी धोनीच्या या कृतीला पाठिंबा दिला आहे.  

टॅग्स :वर्ल्ड कप 2019एम. एस. धोनीभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयआयसीसी