ठळक मुद्देभारतीय महिला क्रिकेट संघाचा आज आयर्लंडशी सामना वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी कर्णधार विराट कोहलीने दिल्या शुभेच्छा
गयाना : आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ सलग तिसरा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय महिलांना आज आयर्लंडचा सामना करावा लागणार आहे. आयसीसी क्रमवारीत आयर्लंडचा संघ पिछाडीवर असला तरी त्यांना कमी लेखण्याची चुक भारतीय खेळाडू करणार नाही. भारतीय महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुढाकार घेतला आहे. भारतीय जर्सी स्त्री-पुरुष असा भेदभाव करत नाही, असा संदेश देत कोहलीने महिला संघाचा शुभेच्छा दिल्या आहेत. असे करताना त्याने रिषभ पंत, फुलराणी सायना नेहवाल आणि भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांना नॉमीनेट केलं आहे.
भारताने 
आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यावर विजय मिळवून उपांत्य फेरीच्या दिशेने कूच केली आहे. उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना आजचा सामना जिंकावा लागेल. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची कामगिरी आतापर्यंत दमदार झाली आहे. त्यात अनुभवी खेळाडू मिताली राजची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. 
आयर्लंडविरुद्ध खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी कोहलीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यात त्याने महिला खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत आणि संघाचे मनोबल उंचावण्यासाठी सायना, सुनील यांच्यासह सर्व खेळाडूंनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केलं आहे. त्याने सर्व खेळाडूंना राष्ट्रीय संघाची जर्सी परिधान करून सोशल मीडियावर महिला खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठी नॉमीनेट केलं आहे.