Join us

West Indies beat England : Deandra Dottinचा भारी कॅच अन् वेस्ट इंडिजचा १९७९नंतर इंग्लंडवर पहिला विजय; World Cup मध्ये घडवला इतिहास

ICC Women's World Cup, West Indies beat England - इंग्लंडला १८ चेंडूंत विजयासाठी ९ धावा करायच्या होत्या, परंतु त्यांच्याजवळ दोन विकेट शिल्लक होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 11:29 IST

Open in App

ICC Women's World Cup, West Indies beat England - इंग्लंडला १८ चेंडूंत विजयासाठी ९ धावा करायच्या होत्या, परंतु त्यांच्याजवळ दोन विकेट शिल्लक होत्या. वेस्ट इंडिजची अनिसा मोहम्मद ४८वे षटक टाकण्यासाठी आली आणि पहिल्याच चेंडूवर इंग्लंडची केट क्रॉस धावबाद झाली. त्यानंतर चौथ्या चेंडूवर अन्या श्रुब्सोले बाद झाली आणि एकच जल्लोष झाला. यजमान न्यूझीलंडपाठोपाठ वेस्ट इंडिजच्या महिला संघाने बुधवारी इंग्लंडला पराभूत करून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. वेस्ट इंडिजने ७ धावांनी हा सामना जिंकला आणि इतिहास घडवला. या सामन्यात संघातील अनुभवी खेळाडू डिएंड्रा डॉटीन ( Deandra Dottin) हिने अफलातून झेल घेत सामन्याला कलाटणी दिली.

प्रथम फलंदाजी करताना डॉटीन आणि हायले मॅथ्यूज यांनी पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची विक्रमी भागीदारी केली. महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील वेस्ट इंडिजकडून ही पहिल्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी २००५ मध्ये नॅडीने जॉर्ज व नेली विलियम्सन यांनी श्रीलंकेविरुद्ध ६८ धावांची भागीदारी केली होती.  मॅथ्यूज ५८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार मारून ४५ धावांवर, तर डॉटीन ३१ धावांवर बाद झाली. त्यानंतर मधली फळी गडगडली,  परंतु शेमीने कॅम्बेल व चेडीन नेशन यांनी डावाला पुन्हा आकार दिला. कॅम्बेलने ६६ व नेशनने ४९ धावा केल्या. वेस्ट इंडिजने ६ बाद २२५ धावा केल्या.

प्रत्युत्तरात इंग्लंडच्या टॅमी ब्यूमोंट ( ४६), डॅनी वॅट ( ३३), सोफी डंक्ली ( ३८), सोफी एस्लेस्टोन ( ३३*) व केट क्रॉस ( २७) यांनी संघर्ष केला. पण, अखेरच्या क्षणाला त्यांच्याकडून घाई झाली आणि हातची मॅच गमावली. इंग्लंडचा संपूर्ण संघ ४७.४ षटकांत २१८ धावांवर तंबूत परतला. शॅमिला कोनेलने ३, हायले मॅथ्यूज व अनिसा मोहम्मद यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.  महिला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजने प्रथमच इंग्लंडवर विजय मिळवला आहे. यापूर्वी १९९३, २००९, २०१३ आणि २०१७  मध्ये इंग्लंडने बाजी मारली होती. १९७९नंतर वेस्ट इंडिजच्या महिलांनी घराबाहेरील मैदानावर प्रथमच वन डे सामन्यात इंग्लंडला पराभूत केले आहे. 

डॉटीनने घेतलेला भन्नाट झेल...  

टॅग्स :आयसीसीवेस्ट इंडिजइंग्लंड
Open in App