Join us  

ICC Women's World Cup, WI vs PAK : १३ वर्षांनंतर पाकिस्ताननं वर्ल्ड कपमध्ये मिळवला विजय; भारतीय संघाला झाली मदत

ICC Women's World Cup, WI vs PAK : पाकिस्तानी महिला संघाने आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत सोमवारी विजयाची चव चाखली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 3:03 PM

Open in App

ICC Women's World Cup, WI vs PAK : पाकिस्तानी महिला संघाने आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत सोमवारी  विजयाची चव चाखली. पावसामुळे बाधित झालेली ही लढत २०-२० षटकांची खेळवण्यात आली. त्यात पाकिस्तानच्या महिलांनी वेस्ट इंडिजवर ८ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. २००९ नंतर पाकिस्तानच्या महिला संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत मिळवलेला हा पहिला विजय ठरला. २००९मध्येही त्यांनी वेस्ट इंडिजला पराभूत केले होते आणि त्यानंतर सलग १८ सामन्यांत त्यांना हार मानावी लागली होती. पाकिस्तानच्या या विजयाचा भारत व इंग्लंड संघाला फायदा झाला आहे.

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या महिला संघाला ७ बाद ८९ धावा करता आल्या. डिएंड्रा डॉटीन ( २७), कर्णधार स्टेफनी टेलर ( १८) व अॅफी फ्लेचर ( १२*) यांनी विंडीजच्या धावसंख्येत हातभार लावला. पाकिस्तानच्या निदा दारने १० धावांत ४ विकेट्स घेतल्या. फातिमा सना, नश्रा संधू  व ओमाइमा सोहैल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. प्रत्युत्तरात पाकिस्तानने १८.५ षटकांत हे लक्ष्य सहज पार केले. मुनीबा अलीने ४३ चेंडूंत ३७ धावांची खेळी केली. तिला कर्णधार बिस्माह मरूफ ( २०*) व सोहैल ( २२*) यांनी उत्तम साथ दिली. पाकिस्तानने हा सामना ८ विकेट्स राखून जिंकला.

या पराभवानंतर वेस्ट इंडिजचा नेट रन रेट घसरला. सहा सामन्यांती त्यांचा हा ३ पराभव ठरला आणि आता त्यांचा नेट रन रेट हा -०.८८५ इतका झाला आहे. भारतीय महिला ५ पैकी २ सामने जिंकून चौथ्या क्रमांकावर आहेत आणि इंग्लंडही पाचव्या क्रमांकावर आहे. भारताचा नेट रन रेट हा +०.४५६ आहे आणि आता त्यांना बांगलादेश व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवता येणार आहे.

टॅग्स :पाकिस्तानवेस्ट इंडिजआयसीसीभारत
Open in App