Indian Womens Team World Champion Bowler Kranti Goud Success Story : भारतीय महिला संघाला पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकायला खूप मोठा संघर्ष करावा लागला. दोन वेळा अगदी ट्रॉफीच्या जवळ जाऊन संघाच्या पदरी निराशा आली. पण हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने तिसऱ्या प्रयत्नात अधुरं स्वप्न सत्यात उतरवलं. भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर या संघाचा भक्कम पाया रचणारी मिताली राज आणि झुलन गोस्वामी या दिग्गज महिला क्रिकेटपटूंनाही आनंदाश्रू अनावर झाले. भारताकडूनच नव्हे तर महिला क्रिकेट जगतात या दोन दिग्गज महिला क्रिकेटपटूंनी आपली खास छाप सोडली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियातून छाप सोडत नवी 'क्रांती' घडवणाऱ्या छोट्या गावातून आलेल्या 'छोरी'ची खास स्टोरी
मिताली राज ही महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी बॅटर आहे. दुसरीकडे झुलन गोस्वामीच्या नावे सर्वाधिक विकेट्सची नोंद आहे. तरीही भारतीय संघाला विश्वविक्रमी डाव साधता आला नव्हता. पण यावेळी भारताच्या लेकींनी इतिहास बदलला.इथपर्यंतचा प्रवास सहज सोपा नव्हता. महिला संघाप्रमाणेच या संघाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या प्रत्येकीचा संघर्षाची एक वेगळी आणि खास स्टोरी आहे. इथं एक नजर टाकुयात अगदी छोट्याशा गावातून येऊन येऊन आपल्यातील धमक दाखवत टीम इंडियातून खास छाप सोडत नवी 'क्रांती' घडवणाऱ्या छोरीची खास स्टोरी
छोट्याशा गावातून येऊन ती जगात भारी ठरली
भारतीय संघातील उजव्या हाताची जलगती गोलंदाज क्रांती गौड ही मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गुवारा या छोट्याशा गावची रहिवाशी आहे.आठवीत शाळा सोडून ती क्रिकेटमध्ये रमली. वयाच्या १२ व्या वर्षी ही मुलगी आपल्या घरासमोरील मैदानात क्रिकेटचा डाव मांडलेल्या मुलांचा खेळ तासन तास बघत बसायची. क्रिकेटबद्दलची तिची गोडी एवढी वाढली की, ती आपल्या भावंडासोबत क्रिकेटच्या मैदानात उतरत टेनिस बॉल क्रिकेटचा आनंद घेऊ लागली. टेनिसचा तिचा प्रवास लेदर बॉल क्रिकेटमध्ये देशासाठी क्रांती घडवणारा ठरेल, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. पण साधनाचां अभाव घरची परिस्थिती बेताची असताना भारताच्या या लेकीनं क्रिकेट जगतात आपली छाप सोडली आहे. ती आज वर्ल्ड चॅम्पियन आहे. वर्ल्ड चॅम्पियनचा टॅग लागल्यावर मध्य प्रदेश सरकारने या युवा गोलंदाजासाठी १ कोटी रुपयांचे बक्षीसही दिले आहे.
चित्रपटाप्रमाणेच आहे तिच्या क्रिकेटमधील प्रवासाची स्टोरी
२०१८ मध्ये तमिळमध्ये 'कना' (Kanaa) नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ऐश्वर्या राजेश (Aishwarya Rajesh) हिने कौशी नावाच्या एका क्रिकेटरची भूमिका साकारली होती. या चित्रपटात एक खेळाडू कमी पडल्यामुळे कौशी मुलांच्या संघातून गोलंदाजी करत खास छाप सोडते आणि मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावर पोहचते, असे चित्र रंगवण्यात आले होते. हीच स्टोरी क्रांती गौडच्या बाबतीत घडली. फरक फक्त एवढाच की, कौशी म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्यानं चित्रपटात फिरकीपटूची भूमिका बजावली होती. पण क्रांतीला फिरकी गोलंदाजी हा प्रकार क्रिकेटमध्ये असतो हेच माहित नव्हते. यामागचं कारण क्रांती ही मुलांसोबत टेनिस क्रिकेट बॉल क्रिकेट खेळायची. टेनिस क्रिकेटमध्ये फिरकीपेक्षा जलदगती गोलंदाजीच केली जाते. त्यामुळेच स्पिन गोलंदाजी हा प्रकारच क्रांतीला ठाऊक नव्हता. २०१७ पर्यंत ती टेनिस बॉलवर खेळत होती.
टेनिस बॉल क्रिकेटमधून लेदर बॉल क्रिकेटकडे कशी वळली?
स्थानिक क्रिकेटमध्ये मुलांच्या संघाकडून खेळताना क्रांती गौड हिने गोलंदाजीसह फलंदाजीत खास छाप सोडत सामनावीरचा पुरस्कार पटकावला होता. या स्थानिक स्पर्धेत छतरपूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षक आणि सचिव राजीव बिल्थरे यांची नजर क्रांतीवर पडली. क्रांतीतील कौशल्य ओळखत त्यांनी तिला लेदर क्रिकेटचे धडे देण्यास सुरुवात केली. आपल्यातील प्रतिभेच्या जोरावर तिने मध्य प्रदेश राज्य महिला वरिष्ठ संघात स्थान मिळवले. २०२४ मध्ये देशांतर्गत क्रिकेटमधील वरिष्ठ महिला वनडे कप (Senior Womens One Day Trophy) स्पर्धेत मध्य प्रदेशच्या महिला संघाने जेतेपद पटकावले. या संघाला जेतेपद मिळवून देण्यात क्रांती गौडही आघाडीवर होती.
आधी मुंबई इंडियन्सची नेट बॉलर झाली मग अल्पावधीत टीम इंडियात मिळाली संधी
२०२४ च्या महिला प्रीमियर लीग स्पर्धेत क्रांती गौड ही हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स महिला संघात नेट बॉलरच्या रुपात सहभागी होती. त्यानंतर २०२५ मध्ये युपी वॉरियर्स संघाने १० लाख रुपये मोजून तिला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. WPL मध्ये लक्षवेधी कामगिरीसह तिने टीम इंडियात एन्ट्री मारली. ११ मे २०२५ रोजी श्रीलंकेविरुद्धच्या वनडेत तिला पदार्पणाची संधी मिळाली. याच मैदानात वर्ल्ड कप स्पर्धेत तिने पाकिस्ताविरुद्ध सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. वर्ल्ड कप स्पर्धेआधी इंग्लंड दौऱ्यावर तिने आपल्या गोलंदाजीत कहर दाखवून दिला होता. चेस्टर-ले-स्ट्रीटच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध तिने ६ विकेट्स घेतल्या होत्या.