भारतात सुरू असलेली महिला विश्वचषक स्पर्धा भारतीय संघासाठी आतापर्यंत निराशाजनक ठरली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये भारताला केवळ दोन सामन्यांत विजय मिळवता आला आहे. तर तीन सामन्यात अटीतटीच्या लढतीत भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाबाबत अनिश्चितता निर्माण झालेली आहे. महिला विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या संघांनी सेमीफायनलमधील प्रवेश निश्चित केला आहे. तर बांगलादेश आणि पाकिस्तानचे संघ स्पर्धेतून बाद झाले आहेत. अशा परिस्थितीत आता भारत, न्यूझीलंड आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये सेमीफायनलच्या उपांत्य फेरीसाठी उरलेल्या एका जागेसाठी चुरस दिसून येत आहे.
महिला विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीतील भारतीय महिला संघाच्या कामगिरीकडे नजर टाकायची झाल्यास हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आतापर्यंत ५ सामन्यांत २ विजय आणि ३ पराभवांसह ४ गुणांची कमाई करून क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय महिला संघाची धावगती +०.५२६ आहे. भारतीय संघाचे आता न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्धचे सामने बाकी असून, या दोन्ही सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघाचं उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल.
भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव केला तर भारतीय संघाचं सेमीफायनलमधील स्थान निश्चित होईल. मात्र न्यूझीलंडकडून भारतीय संघाचा पराभव झाला आणि भारतीय संघानं बांगलादेशला पराभूत केलं, तर मात्र भारतीय संघाला न्यूझीलंडचा इंग्लंडकडून पराभव व्हावा यासाठी प्रार्थना करावी लागेल. तसं झालं तर भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी असेल. मात्र भारती संघाचा दोन्ही सामन्यात पराभव झाला तर मात्र भारताचं आव्हान साखळीतच संपुष्टात येईल.
दरम्यान, महिला विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीनंतर समान गुण झाल्यास संघांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी निश्चित करण्यात आलेले नियम पुढील प्रमाणे आहेत. सर्वाधिक विजय मिळवणारा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी राहील. जर विजय सारखे असले तर नेट रनरेट विचारात घेतला जाईल. त्यानंतरही बरोबरी कामय राहिली तर एकमेकांविरुद्ध झालेल्या लढतीमधील निकाल विचारात घेतला जाईल. यातही बरोबरी कामय राहिल्यास संघांची लीग स्टेजमधील सीडिंग विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल.