आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेने धडक मारली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या तगड्या संघाला रोमांचकारी सामन्यात पाणी पाजले आहे. अशातच विजेतेपदासाठी भारतीय संघाचा जोश हाय असून उद्या, रविवारी दुपारी ३ वाजता हा सामना खेळविला जाणार आहे. महत्वाचे म्हणजे हे दोन्ही संघ यापूर्वी कधीच फायनलमध्ये एकमेकांविरोधात खेळलेले नाहीत, परंतू आजवर ३४ सामन्यांत भिडलेले आहेत. या सामन्यांत कोणाचे पारडे जड आहे, यावर दोन्ही संघांचे बलाबल लक्षात घेतले जात आहे.
ICC Women's World Cup 2025 Final ही नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळविली जाणार आहे. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात एकूण ३४ सामने झाले आहेत. या ३४ सामन्यांमध्ये भारतीय संघाने तब्बल २० वेळा विजय मिळवला आहे, तर दक्षिण आफ्रिकेला केवळ १३ सामने जिंकता आले आहेत. या आकडेवारीनुसार भारताचे पारडे जड आहे. परंतू, या वर्ल्डकपमधील सामने पाहता दक्षिण आफ्रिकेचे पारडे जड दिसत आहे.
या स्पर्धेत काय घडले...
वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघ आधी भिडलेले आहेत. नदिन डी क्लार्क हिने ८४ धावांची नाबाद खेळी करून भारताच्या हातातून विजय खेचून नेला होता. या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सात सामन्यांत साऊथ आफ्रिकेने पाच सामने जिंकलेले आहेत. तर दोन हरलेले आहेत. तर भारतीय संघाने तीन सामने जिंकलेले आहेत, तीन हरलेले आणि एक अनिर्णित झालेला आहे. यानुसार या स्पर्धेत साऊथ आफ्रिकेचे पारडे जड दिसत आहे.
एक योगायोग म्हणजे दोन्ही संघांनी साखळी सामन्यात ज्यांच्याकडून पराभव पत्करला त्यांनाच सेमीफायनलमध्ये हरविले आहे. आफ्रिकेने इंग्लंडला आणि भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आणखी एक लक्षात घेण्यासारखे समीकरण म्हणजे १९९७ पासून आतापर्यंत जेवढे वर्ल्डकप झाले, त्यात दोन्ही संघांनी एकमेकांना तीन-तीन वेळा हरविलेले आहे. यामुळे अंतिम सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला चांगला खेळ करावा लागणार आहे.