सध्या सुरू असलेल्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वसषक स्पर्धेत भारतीय महिला संघाची कामगिरी लौकिकाला साजेशी झालेली नाही. तरीही भारतीय महिला संघानं तीन विजय, तीन पराभव आणि एक अनिर्णित लढतीसह स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळवलं आहे. आता उपांत्य लढतीत भारतीय महिला संघाची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. मात्र या लढतीपूर्वी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारताची सलामीवीर प्रतिका रावल ही जखमी झाल्याने विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडली आहे.
रविवारी बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यावेळी क्षेत्ररक्षण करताना प्रतिका हिच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. या सामन्यात बांगलादेशचा डाव सुरू असताना प्रतिका हिने एक चेंडू अडवताना ही घटना घडली होती. अखेरीस पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रद्द करण्यात आला.
आता प्रतिका रावल दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या उपांत्य लढतीत स्मृती मंधानासोबत सलामीला कोणाला पाठवायचे असा प्रश्न भारतीय संघव्यवस्थापनासमोर उभा राहिला आहे. अशा परिस्थितीत बांगलादेशविरुद्ध सलामीला उतरलेल्या अमनज्योत कौर हिला सलामीला पाठवलं जाईल की कुठल्या अन्य फलंदाजावर ही जबाबदारी सोपवली जाईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.