यूएईत पार पडलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्ताननं पहिल्याच सामन्यात टीम इंडियावर विजय मिळवून इतिहास रचला. पाकिस्तानचा वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाविरुद्ध हा पहिलाच विजय ठरला. त्यामुळे आता उभय संघ पुन्हा पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत एकमेकांसमोर येतात का, याची सर्वांना उत्सुकता आहे. पण, तत्पूर्वी पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये पार पडणाऱ्या महिला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यात महामुकाबला पाहायला मिळणार आहे. आयसीसीनं बुधवारी ICC Women’s World Cup 2022 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दोन्ही संघ या स्पर्धेची सुरुवात एकमेकांविरुद्ध खेळून करणार आहेत. मिताली राज ( Mithali Raj) हिची कदाचित ही अखेरची वर्ल्ड कप स्पर्धा असल्यामुळे टीम इंडिया तिला विजयी भेट देण्यासाठी सज्ज आहेत.
भारतीय संघाला २०१७च्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. पाकिस्तानसह भारताला वर्ल्ड कप २०२२ मध्ये न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तगड्या प्रतिस्पर्धींचा सामना करावा लागणार आहे. भारतीय संघ जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरणार आहे. त्यांना दोनवेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. ४ मार्चला सुरू होणाऱ्या या स्पर्धेत पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज अशी लढत होणार आहे. ३१ दिवसांत ३१ सामने खेळवले जातील आणि ८ संघ जेतेपदासाठी भिडणार आहेत.
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारत यांना
आयसीसी महिला अजिंक्यपद २०१७-२०२० या स्पर्धेतील क्रमवारीच्या जोरावर या स्पर्धेची पात्रता मिळवली, तर न्यूझीलंड यजमान म्हणून पात्र ठरले. त्यानंतर वन डे क्रमवारीच्या जोरावर बांगलादेश, पाकिस्तान व वेस्ट इंडिज यांनी अंतिम ३ जागा पटकावल्या.
![]()
भारतीय संघाचे वेळापत्रक
- ६ मार्च - भारत विरुद्ध पाकिस्तान, बे ओव्हल तौरंगा
- १० मार्च - भारत विरुद्ध न्यूझीलंड, हॅमिल्टन
- १२ मार्च - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, हॅमिल्टन
- १६ मार्च - भारत विरुद्ध इंग्लंड, बे ओव्हल तौरंगा
- १९ मार्च - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ईडन पार्क ऑकलंड
- २२ मार्च - भारत विरुद्ध बांगलादेश, हॅमिल्टन
- २७ मार्च - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ख्राईस्टचर्च