Join us

ICC Women’s T20I Player Rankings : स्मृती मानधना, शेफाली वर्मा यांना धक्का; जेमिमा रॉड्रीग्जची टॉप टेनमध्ये एन्ट्री!

ICC Women’s T20I Player Rankings for batters : भारतीय महिला संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करून इतिहास रचला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 15:13 IST

Open in App

ICC Women’s T20I Player Rankings for batters : भारतीय महिला संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करून इतिहास रचला. १९९८नंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश केला गेला आणि त्यात भारतीय महिलांनी रौप्यपदक जिंकले. भारताच्या पुरुष संघाला १९९८मध्ये पदक जिंकता आले नव्हते. २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या सुवर्णपदकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने सुवर्णपदक जिंकले. भारतीय महिलांनी ३५ धावांत ८ विकेट्स गमावल्याने हातचे सुवर्णपदक निसटले. या कामगिरीनंतर आयसीसी ट्वेंटी-२० क्रमवारीतही भारतीय फलंदाजांना तोटा सहन करावा लागला, तर ऑसी खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मूनी हिने अव्वल क्रमांकावर झेप घेतली, तर कर्णधार मेग लॅनिंग दुसऱ्या स्थानावर विराजमान झाली आहे. मूनीने राष्ट्रकुल स्पर्धेत ५ सामन्यांत १७९ धावा केल्या आणि त्यामुळे २८ वर्षीय मूनीने अव्वल स्थान पटकावले. लॅनिंगला या स्पर्धेत ९१ धावाच करता आल्या, परंतु तिच्या अनुभवी कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने राष्ट्रकुल स्पर्धेत वर्चस्व कायम राखले. टॉप टेनमध्ये मूनी व लॅनिंगसह ऑस्ट्रेलियाच्या ताहलिया मॅग्राथ ( ५) व एलिसा हिली ( ९) या दोन खेळाडूही आहेत.

भारताच्या जेमिमा रॉड्रीग्जने मोठी झेप घेतली. तिने सात स्थानांच्या सुधारणेसह १०वे क्रमांक पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेत तिने भारताकडून सर्वाधिक १४६ धावा केल्या. स्मृती मानधनाची दोन स्थानांनी घसरण झाली आणि ती चौथ्या क्रमांकावर आली. तर शेफाली वर्माही १ स्थान खाली सरकून सहाव्या क्रमांकावर गेली आहे.  दक्षिण आफ्रिकेची एनेके बॉश ( २०) व ताझमिन ब्रिस्ट ( २२) यांनीही त्यांची क्रमवारी अनुक्रमे ५ व ६ क्रमांकानी सुधारली.  

इंग्लंडची गोलंदाज सोफी एस्क्लेस्टोन अव्वल क्रमांकावर कायम आहे.  भारताची दीप्ती शर्मा ६व्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीत इंग्लंडच्या खेळाडूंनी अव्वल तीन स्थान पटकावले आहे.  सोफीनंतर कॅथरीन ब्रंट व साराह ग्लेन यांचा क्रमांक येतो. 

टॅग्स :स्मृती मानधनाराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा
Open in App