Join us

ऑस्ट्रेलियाचा तारणहार, नवा शेन वॉर्न ; 8 विकेट घेत रचला वर्ल्ड रेकॉर्ड

128 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडच्या सलामीविरांनी 7.2 षटकांमध्ये 47 धावा फटकावल्या होत्या. इंग्लंड हा सामना सहज खिशात घालेल असं वाटत असतानाच लेगस्पिनर लॉइड पोप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 07:48 IST

Open in App

क्विन्सटाउन : न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या युवा (19 वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत धडक दिली आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात त्यांनी इंग्लंडवर 31 धावांनी मात केली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो युवा लेगस्पिनर लॉइड पोप. त्याने केलेली कामगिरी 19 वर्षांखालील वर्ल्ड कपमधील आतापर्यंतची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी ठरली. त्याच्या या कामगिरीनंतर क्रिकेटविश्वात ऑस्ट्रेलियाला नवा शेन वॉर्न मिळाल्याची चर्चा आहे. पोपची शैली महान फिरकीपटू शेन वॉर्नच्या शैलीशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाचा नवा शेन वॉर्नही म्हटलं जातं आहे.क्विन्सटाउन येथे झालेल्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर केवळ 33.3 षटकांत कांगारूंचा संघ 127 धावांमध्ये गारद झाला. 128 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडच्या सलामीविरांनी 7.2 षटकांमध्ये 47 धावा फटकावल्या होत्या. इंग्लंड हा सामना सहज खिशात घालेल असं वाटत असतानाच लेगस्पिनर लॉइड पोप याने पुढच्याच चेंडूवर पहिला बळी मिळवला. त्यानंतर एकामागोमाग एक 8 विकेट घेत त्याने इंग्लंडचं पार कंबरडं मोडलं. त्याच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडचा अक्खा संघ 23.4 षटकातच अवघ्या 96 धावांवर ऑल आउट झाला आणि ऑस्ट्रेलियाने 31 धावांनी विजय मिळवला. पोपने 8 विकेट घेऊन संघाला विजय मिळवून दिला तसंच वर्ल्ड रेकॉर्ड देखील केला. अंडर 19 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाकडून हे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन ठरलं.पोपने इंग्लंडच्या फलंदाजांना नाचवताना 9.4 षटकात 3.62 च्या सरासरीने केवळ 35 धावा देऊन 8 विकेट घेतल्या. इतकंच नाही तर या सामन्यात त्याने दोन निर्धाव षटकंही टाकली. या दमदार प्रदर्शनासाठी पोपला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. उपांत्य फेरीत दाखल होणारा ऑस्ट्रेलिया हा पहिलाच संघ ठरला असून त्यांचा सामना न्यूझीलंड व अफगाणिस्तान यांच्यातील विजेत्या संघाशी होईल.   

टॅग्स :19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धाआॅस्ट्रेलियाइंग्लंड