Join us  

रांची कसोटी कोहलीसाठी आहे खास, कसोटी क्रमावारीत होईल का विकास?

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं 2019मधील कसोटी क्रिकेटमधले पहिले शतक दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत झळकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 10:53 AM

Open in App

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं 2019मधील कसोटी क्रिकेटमधले पहिले शतक दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत झळकावले. त्यानं 254 धावांची विक्रमी खेळी करताना संघाला 601 धावांपर्यंत मजल मारून दिली आणि प्रत्युत्तरात आफ्रिकेला दोन्ही डावात मिळूनही हा पल्ला गाठता आला नाही. भारतानं हा सामना एक डाव व 137 धावांनी जिंकला. त्या 254 धावांच्या खेळीचा कोहलीला आयसीसी कसोटी क्रमवारीत खूप मोठा फायदा झाला. कोहलीनं तब्बल 37 गुणांची कमाई केली आणि 936 गुणांसह दुसऱ्या स्थानावरील पकड मजबूत करताना अव्वल स्थानाच्या दिशेनं पुन्हा कूच केली आहे. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना 19 ऑक्टोबरपासून रांची येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात कोहलीला फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेण्याची संधी आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ 937 गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे आणि कोहलीला त्याला मागे टाकण्यासाठी केवळ दोन गुणांची कमाई करावी लागणार आहे. अॅशेस मालिकेतील दमदार कामगिरीनंतर स्मिथनं कॅप्टन कोहलीकडून अव्वल स्थान हिसकावले होते. आता कोहलीकडे त्याची परतफेड करण्याची संधी आहे.

गोलंदाजांत भारताच्या आर अश्विननं तीन स्थानांच्या सुधारणेसह सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अश्विननं 6 विकेट्स घेतल्या होत्या. पहिल्या कसोटीत अश्विननं पहिल्या डावात सात विकेट्स घेतल्या होत्या. फलंदाजांत मयांक अग्रवालनेही कारकिर्दीतील सर्वोत्तम 17 वे स्थान पटकावले आहे. कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या उमेश यादवनं सहा स्थानांच्या सुधारणेसह 25वा क्रमांक पटकावला आहे.  

धोनी अन् गांगुलीपेक्षा कॅप्टन कोहली वेगळा; गंभीरनं सांगितलं कारण  कोहलीच्या या विक्रमी कामगिरीचे कौतुक करताना महेंद्रसिंग धोनी आणि सौरव गांगुली यांच्यापेक्षा कोहली वेगळा का आहे, ते माजी सलामीवीर गौतम गंभीरने सांगितले. तो म्हणाला,''तुम्ही पराभवाला घाबरलात, तर कधीच विजय मिळवू शकत नाही आणि कोहली कधीच पराभवाला घाबरला नाही. आपण सर्व सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनी यांच्याबद्दल बोलत आलोय, परंतु विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ परदेशातही विजय मिळवू लागला आहे.''

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीआयसीसीस्टीव्हन स्मिथ